फेकण्याऐवजी वापरलेल्या चहा पावडरचा 'असा' करा वापर, मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 10:54 AM2024-10-16T10:54:30+5:302024-10-16T10:55:53+5:30
Reuse Chaipatti : आज आम्ही तुम्हाला ही वापरलेली चहा पावडर वापरून काय काय करू शकता हे सांगणार आहोत.
Reuse Chaipatti : सामान्यपणे भारतात सगळ्याच घरांमध्ये दिवसाची सुरूवात गरमागरम चहाने होते. जास्तीत जास्त लोक चहा गाळल्यानंतर शिल्लक राहिलेली चहा पावडर कचऱ्यात फेकतात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, ही वापरलेली चहा पावडर अनेक दृष्टीने तुमच्या कामात पडू शकते. आज आम्ही तुम्हाला ही वापरलेली चहा पावडर वापरून काय काय करू शकता हे सांगणार आहोत.
चहा पावडरचा कसा कराल वापर?
- वापरलेल्या चहा पावडरचा उपयोग तुम्ही झाडांसाठी खत म्हणूनही करू शकता. यासाठी चहा पावडर उन्हात वाळत घाला. नंतर थोड्या थोड्या प्रमाणात ती तुम्ही झाडांना टाका. मनी प्लांट आणि गुलाबाच्या झाडांसाठी ही पावडर खूप फायदेशीर ठरते.
- ही चहा पावडर तुम्ही पुन्हा उकडून घ्या आणि नंतर एका स्प्रे बॉटलमध्ये टाकून खिडक्यांच्या काचा किंवा काचेची भांडी स्वच्छ करू शकता. याने काचेची भांडी चमकदार होतील.
- शिल्लक राहिलेली चहा पावडर तुम्ही केसांवरही लावू शकता. याने केस चमकदार आणि मजबूत होतात. चहा पावडर तुम्ही मेहंदीमध्ये टाकून केसांवर लावू शकता. तसेच चहा पावडरचं पाणी हेअरवॉश म्हणूनही वापरू शकता.
- घरातील माश्या पळवून लावण्यासाठी देखील तुम्ही या चहा पावडरचा वापर करू शकता. यासाठी चहा पावडर पाण्यात उकडून या पाण्याने लादी पुसावी. याने घरातील कीटकही बाहेर निघून जातील.
- तसेच चहा पावडरच्या मदतीने तुम्ही पायांची येणारी दुर्गंधी सुद्धा दूर करू शकता. यासाठी चहा पावडर पाण्यात उकडून घ्या आणि या पाण्यात १० ते १५ मिनिटे पाय ठेवून बसा. याने पायांची दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळेल.