मी रोज एक पेग घेते, तोच आमचा डोस; दारूचं महत्त्व सांगणाऱ्या महिलेचा व्हिडीओ तुफ्फान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 02:46 PM2021-04-19T14:46:11+5:302021-04-19T14:47:58+5:30
दिल्लीत आठवडाभर लॉकडाऊन; दारुच्या दुकानांबाहेर तळीरामांच्या रांगा
दिल्ली: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. आज रात्री १० वाजल्यापासून दिल्लीमध्ये लॉकडाऊन असेल. पुढील सोमवारपर्यंत दिल्लीत लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची घोषणा करताच दारुच्या दुकानांवर एकच झुंबड उडाली. आठवड्याची सोय करण्यासाठी सगळ्याच तळीरामांनी दुकानं गाठली.
लॉकडाऊनची घोषणा होताच दारु विकणाऱ्या दुकानांसमोर मोठ मोठ्या रांगा लागल्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाला. खान मार्केट, गोल मार्केटमधील दारुच्या दुकानांबाहेर मोठी गर्दी जमली. यामध्ये अनेक जण विनामास्क होते. तर सोशल डिस्टन्सिंगचेदेखील तीन तेरा वाजले होते.
दिल्लीमधील शिवपुरी गीता वसाहतीत असलेल्या एका दारुच्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या एका महिलेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दारू हेच औषध असल्याचं ही महिला सांगत होती. 'मी एक बाटली आणि दोन क्वॉर्टर घ्यायला आले आहे. इंजेक्शननं फायदा होत नाही. अल्कोहोलनं फायदा होतो. इथे आलेली जितकी माणसं आहेत, जी दारू पितात, ती अगदी व्यवस्थित राहतील. मद्यपी सगळे उत्तम राहणार. आमच्यावर औषधाचा काही परिणाम होत नाही. आमच्यावर फक्त दारूचा परिणाम होतो,' असं ही महिला सांगत होती.
#WATCH Delhi: A woman, who has come to purchase liquor, at a shop in Shivpuri Geeta Colony, says, "...Injection fayda nahi karega, ye alcohol fayda karegi...Mujhe dawaion se asar nahi hoga, peg se asar hoga..." pic.twitter.com/iat5N9vdFZ
— ANI (@ANI) April 19, 2021
मी ३५ वर्षांपासून दारु पितेय. इतक्या वर्षात मी कोणताही दुसरा डोस घेतला नाही. रोज एक पेग घेते. तोच आमचा डोस. दिल्लीत एक आठवड्याचा लॉकडाऊन सुरू झाला आहे. पण या कालावधीत दारुची दुकानं सुरू राहायला हवीत. मला आम्हाला डॉक्टरांकडे, रुग्णालयांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. आतापर्यंत आम्हाला आवश्यकता वाटली नाही. यापुढेही वाटणार नाही, असं या महिलेनं सांगितलं. सध्या या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.