'एक विवाह ऐसा भी'! लग्नानंतर सासरी जाण्याऐवजी नवरी पोहोचली थेट परीक्षा केंद्रावर अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 04:31 PM2024-02-01T16:31:48+5:302024-02-01T16:34:01+5:30
उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर सासरी जाण्याऐवजी या नववधूने थेट परीक्षा हॉल गाठले.
Social viral : झांसी येथील विद्यापीठात एक अनोखी घटना घडली आहे. नववधूच्या पेहरावात परीक्षा केंद्रावर नवरी दाखल झाली. नव्या नवरीला लग्नाच्या जोड्यात पाहून लोक चकितच झाले. खरंतर एखाद्या मुलीचे लग्न झाल्यानंतर तिच्या नव्या दिवसाची सुरुवात ही सासरच्या घरातूनच होते. पण याउलट ही नवरी सासरी जाण्याऐवजी परीक्षा केंद्रावर पोहोचली. मिळालेल्या माहितीनूसार, नवरीचा भाऊ आणि दीर दोघे तिला परीक्षा केंद्रावर पोहचवण्यासाठी आले होते.
दरम्यान, वधूने लग्नाचा कार्यक्रम उरकल्यानंतर तिच्या सासरच्या माणसांकडे सकाळी परीक्षेला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. घरात आणि सासरच्या लोकांमध्ये यावर चर्चा झाली, मग सगळ्यांनी तिला आनंदाने होकार दिला.सासरच्या मंडळींनीही शिक्षणाला प्राधान्य दिल्याने या घटनेची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.
झाशीच्या बुंदेलखंड विद्यापीठात शिकणारी खुशबू राजपूत ही पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थिनी आहे. काल रात्री खुशबूचे लग्न झाले होते. तिचा पाठवणी सकाळी होणार होती. मात्र सासरी जाण्यापूर्वी खुशबूने तिच्या कुटुंबीयांना तिला परीक्षेला बसू देण्याची विनंती केली. खुशबू जेव्हा नवरीच्या वेशात परीक्षा हॉलमध्ये पोहोचली तेव्हा इतर परीक्षार्थी तिच्याकडे पाहतच राहिले. नवरी परीक्षा द्यायला आल्यानंतर तिला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
शिकण्याची इच्छा व्यक्त करताच तिच्या कुटुंबियांसह सासरच्या मंडणींनी परीक्षेस बसण्यास होकार दिला. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसतंय. आधी परीक्षा आणि नंतर निरोपाचा कार्यक्रम असे पती आणि सासरच्या मंडळींनी सांगितले होते. लग्नात सर्व काही घाईघाईत केल्याचे सांगितले. सगळ्यात आधी परीक्षा होणार आणि त्यानंतर निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडणार, हे सासूबाईंनी आधीच ठरवून टाकलं होतं.