Ravindra Jadeja, IND vs AUS: रवींद्र जडेजाने फक्त २४ तासांसाठी केलं ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला 'फॉलो'; जाणून घ्या त्यामागची मजेशीर गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 11:00 AM2023-02-20T11:00:00+5:302023-02-20T11:01:53+5:30
इन्स्टाग्राम स्टोरीवर जाडेजाने तो स्क्रीनशॉटही केला शेअर
Ravindra Jadeja Nathan Lyon, IND vs AUS 2nd Test: भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर यजमानांनी मालिकेतील दुसरा कसोटी सामना ६ विकेट्सने जिंकला. विशेष म्हणजे टीम इंडियाने तिसऱ्या दिवशीच हा सामना जिंकला. या दरम्यान, अष्टपैलू रवींद्र जाडेजाने सामना संपल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या एका खेळाडूला सोशल मीडियावर एक 'भेट' दिली.
जाडेजा ठरला सामनावीर
अष्टपैलू रवींद्र जाडेजाने दिल्ली कसोटीत चमकदार कामगिरी केली. त्याने दोन्ही डावात एकूण १० विकेट्स घेतल्या. जाडेजाला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्याने पहिल्या डावात २१ षटकांत ६८ धावांत ३ बळी घेतले. त्यानंतर दुसऱ्या डावात त्यांना कांगारूंची तारांबळ उडवली. त्याने १२.१ षटकांत ४२ धावा देत ७ बळी घेतले. ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने डावातील उर्वरित ३ विकेट्स घेतल्या.
नॅथन लायन-जाडेजा कनेक्शन
३४ वर्षीय रवींद्र जाडेजा या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायनच्या फॉलो करू लागला. तो आता फक्त इंस्टाग्रामवर लायनला फॉलो करतो. त्याचा स्क्रीनशॉटही त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. जाडेजाने सांगितले की, तो २४ तास नॅथन लायनला फॉलो करत आहे. अशा स्थितीत जाडेजाने एखादी पैज हरली आहे की असे करण्यामागे आणखी काही कारण आहे, याचा चाहतेही विचार करत आहेत. पण जाडेजाने मात्र नॅथन लायनला आपला मित्र म्हटले आहे.
हे आहे खरं कारण
जाडेजाने लायनला फॉलो का केलं त्याचं खरं कारण पहिल्या डावात लपलेलं आहे. जाडेजाला इन्स्टाग्रामवर कोणालाच फॉलो करत नाही. त्यावरूनच या दोघांमध्ये संवाद झाला. पहिल्या डावात लायन जाडेजाला म्हणाला, "तू मला इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाहीस. तू मला फॉलो करशील याची मी कधीपासून वाट पाहतोय. तू इतर कोणालाही फॉलो करत नाहीस. मला फॉलो करशील का?" हे संपूर्ण संवाद स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाला. त्यानंतर जाडेजाने हे मजेशीर काम केलं.
भारताने मिळवला मोठा विजय
दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६३ धावांत आटोपल्यानंतर भारताने २६२ धावा केल्या. यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ ११३ धावांवर रोखला. त्यानंतर टीम इंडियाने ४ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. आता मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर १ मार्चपासून खेळवला जाणार आहे.