लय भारी! ३ मित्रांनी सुरू केला कॉफीचा बिझनेस; अन् आता कोट्यावधींची कमाई घेताहेत राव
By manali.bagul | Published: October 1, 2020 03:57 PM2020-10-01T15:57:05+5:302020-10-01T16:05:15+5:30
International coffee day 2020: कॉलेजच्या जीवनात एक चांगली कॉफी प्यायला मिळावी असं नेहमीच या तिघांनाही वाटायचं. कालांतराने कॉफीचा व्यवसाय करायचा त्यांनी ठरवलं.
चहा, कॉफीवर अनेकांचे प्रेम असते. तुम्ही विचारही केला नसेल पण याच कॉफीमुळे एखादा माणूस करोडपती सुद्धा होऊ शकतो. तीन मित्रांनी मिळून डोक्यात आलेली कल्पना सत्यात उतरवत कमाल करून दाखवली आहे. उत्तम कॉफीची चव चाखता यावी या भावनेतून या तीघांनी छोटासा व्यवसाय सुरू केला होता. आज आम्ही तुम्हाला या तीन मित्रांची प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहोत. कॉलेजच्या जीवनात एक चांगली कॉफी प्यायला मिळावी असं नेहमीच या तिघांनाही वाटायचं. कालांतराने कॉफीचा व्यवसाय करायचा त्यांनी ठरवलं.
अजित, अरमान आणि अश्वजीत अशी या त्रिकूटाची नावं आहेत. हा व्यवसाय सुरू केल्यानंतर तब्बल ४ वर्षांनी या तिघांनाही याची पावती मिळाली आहे. यांनी सुरू केलेल्या कॉफी शॉपचं नाव स्लिपी आऊल ब्रू कॉफी स्टार्टअर आहे. गेल्या दोन वर्षात Sleepy Owl ची वाढ १०० टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे. भारतातील सर्वाधिक लोकांना चहा प्यायला खूप आवडतं. अशा स्थितीत कॉफी पित असलेल्यासाठी व्यवसाय सुरू करून नफा मिळवणं हे खूपच कठीण होतं. कारण कोणताही नवीन बँण्ड बाजारात आल्यास लोकांच्या पसंतीस उतरण्यास जास्तवेळ लाग लागतो. पण या त्रिकूटानं आपला कॉफीचा व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे.
सुरूवातीला स्लिपी ओलचं काम सुरू करण्यासाठी या तिघांना १२ लाख रुपये गुंतवावे लागले होते. स्वतःजवळची बचत आणि कुटुंबियांच्या मदतीनं त्यांनी ही रक्कम गुंतवली होती. त्यांनतर डीएसजी भागिदारांकडून ३.५ कोटींचा निधी मिळाल्यानंतर त्याचा व्यवसाय पुढे प्रगती करू लागला. तब्बल २५ हजार ग्राहकांपर्यंत त्यांचा व्यवसाय पोहोचला आहे. सध्या त्यांचे रिटेल स्टोअर्स १०० पेक्षा जास्त आहेत. येत्या २ वर्षात हजारपेक्षा जास्त स्टोअर्स खरेदी करण्याचा त्यांचा विचार आहे. सध्या या कंपनीकडून नवीन फ्लेवर्सवर काम सुरू असून प्रत्येकांच्या ऑफिसमध्ये आणि घराघरात या कॉफीचा वापर केला जावा असे त्यांचे मत आहे.
ग्राहकांपर्यंत उत्पादनं पुरवण्यासाठी Sleepy Owl बी2बी आणि बी2सी प्लॅटफॉर्मवर काम सुरू आहे. त्यांची उत्पादनं त्यांच्या वेबसाइट प्रमाणेच Amazon वर देखील उपलब्ध आहेत. बी2बी अंतर्गत कंपनीने कॅफे आणि काही रेस्टॉरंट्सबरोबर देखील करार केला आहे शिवाय कॉर्पोरेट ऑफिसबरोबर देखील त्यांनी करार केला आहे. अनेक मोठ्या चेन्स, दुकानांमध्ये या कंपनीची कॉफी विक्रीसाठी आहे. या तिघांची कहाणी अनेक होतकरू तरूण तरूणींसाठी प्रेरणादायी ठरली आहे.