मटर पनीरऐवजी 'चिकन करी' देणं पडलं महागात; रेस्टॉरंटला भरावा लागला २० हजारांचा दंड!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 02:30 PM2022-07-18T14:30:54+5:302022-07-18T14:32:40+5:30
शाकाहारी पदार्थाऐवजी मांसाहारी पदार्थाची डिलिव्हरी झाल्यामुळे रेस्टॉरंटला २० हजारांचा दंड भरावा लागला आहे.
ग्वाल्हेर :
आजच्या धावपळीच्या जगात ऑनलाइन व्यवहाराचे प्रमाण वाढले असून यामध्ये ऑनलाइन जेवण मागवण्याचेही प्रमाण अधिक आहे. अनेकवेळा चुकीच्या ऑर्डर दिल्याची अनेक प्रकरणे समोर येत असतात. मात्र जर शाकाहारी व्यक्तीला चुकून मांसाहारी जेवण दिले गेले तर मोठी गडबड होऊ शकते. कारण एका व्यक्तीच्या छोट्याश्या चुकीमुळे रेस्टॉरंटला काहीवेळा दंडही भरावा लागतो. असेच एक प्रकरण घडले आहे ज्यामुळे एका रेस्टॉरंटला २० हजार रूपयांचा दंड भरावा लागला आहे. ग्वाल्हेरमधील एका कुटुंबाने शहरातील प्रसिद्ध जिवाजी क्लबमधून 'झोमॅटो'वर शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली. मात्र त्यांच्या घरी मटर पनीरऐवजी चिकन करीची डिलिव्हरी मिळाली.
२० हजार रूपयांचा दंड
ऑर्डर उघडून पाहताच मटर पनीऐवजी चिकन करी पाहून कुटुंबियांना धक्का बसला. माहितीनुसार, हे कुटुंब शुद्ध शाकाहारी होते, यामुळे घरातील कोणत्याच सदस्याने या ऑर्डरमधील काहीच खाल्ल नाही. आपल्याला आलेल्या वाईट अनुभवामुळे कुटुंबीयांनी या गंभीर प्रकरणाबाबत ग्राहक मंचात याचिका दाखल केली आणि मंचाने क्लबच्या किचनला तब्बल २० हजार रूपयांचा दंड ठोठावला.
रिपोर्टनुसार, फोरमच्या एका अधिकाऱ्याने या घटनेचा निषेध करून हा सेवेचा अभाव असल्याचं म्हटलं आहे. हे निष्काळजीपणाचे प्रकरण असून त्यामुळे तक्रारदाराला मानसिक व शारीरिक इजा झाली आहे. लक्षणीय बाब म्हणजे दंडाच्या रकमेबरोबरच तक्रारदाराने लढलेल्या खटल्याचा खर्चही भरावा लागणार आहे. यामुळे आपल्याही भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
२६ जून रोजीची घटना उघड
जिवाजी क्लबचे स्थायी सदस्य आणि शहरातील रहिवासी सिद्धार्थ श्रीवास्तव यांनी २६ जून रोजी मटर पनीरची ऑर्डर दिली. मात्र झोमॅटोने मासांहार दिल्याने क्लबला शिक्षा झाली आहे, यासाठी वकील श्रीवास्तव यांनी तक्रार केली. मात्र जिवाजी क्लबचा सदस्य असून देखील कारवाई झाली नाही. ग्राहक मंचाने या प्रकरणाची सुनावणी करताना जिवाजी क्लबच्या स्वयंपाकघरातील निष्काळजीपणा मान्य करत त्यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय दिला.