Jasprit Bumrah IND vs ENG 1st ODI: ब्रुम..बा..!! स्टेडियममध्ये चिमुरड्याने केला बुमराहच्या नावाचा 'बोबडा' जयघोष; जुना Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 01:24 PM2022-07-13T13:24:44+5:302022-07-13T13:25:09+5:30
चिमुरड्याचा हा व्हिडीओ तुमच्या चेहऱ्यावरही नक्कीच हास्य खुलवेल
Jasprit Bumrah Small Kid Video, IND vs ENG 1st ODI: टीम इंडियाने इंग्लंडविरूद्धचा पहिला वन डे सामना १० गडी राखून अगदी सहज जिंकला. भारताच्या विजयात जसप्रीत बुमराहचा मोठा वाटा होता. जसप्रीत बुमराहने १९ धावांत ६ गडी बाद केले आणि इंग्लंडचा डाव ११० धावांवरच संपुष्टात आणला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने नाबाद ७६ धावा कुटत संघाला विजय मिळवून दिला. जसप्रीत बुमराहची ही कामगिरी साऱ्यांचेच डोळे दिपवणारी होती. मोठी माणसं तर बुमराहची वाहवा करत होतेच. पण इंग्लंडच्या स्टेडियममध्ये एक चिमुरडा देखील बोबड्या बोलीत बुमराहच्या नावाचा जयघोष करतानाचा जुना व्हिडीओ काल नव्याने व्हायरल झाल्याचे दिसले.
जसप्रीत बुमराहने डावाच्या सुरूवातीच्या पाच-सहा षटकांतच इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. मोहम्मद शमीने त्याला दुसऱ्या बाजून उत्तम साथ दिली. या दोघांच्या गोलंदाजीच्या बळावर भारताने इंग्लंडची अवस्था ५ बाद २६ इतकी वाईट झाली होता. संपूर्ण स्टेडियममध्ये बुमराहच्या नावाचा जयघोष सुरू होता. इंग्लंडमध्ये सामना सुरू असूनही स्टेडियममधील आवाज ऐकल्याने भारतातच सामना सुरू असल्याचा फिल चाहत्यांना येत होता. अशा वेळी बुमराहच्या नावाचा जयघोष करणाऱ्या चिमुरड्याचा जुना व्हिडीओही व्हायरल झाला.
आधीच्या एका सामन्यात चिमुरड्याला बुमराहच्या नावाचा जयघोष करण्याचा मोह आवरला नव्हता. भारत आर्मीची कॅप घातलेला एक चिमुरडा बुमराह, बुमराह असं ओरडण्याचा प्रयत्न करत होता. पण हे नाव उच्चारण्यासाठी थोडं कठीण असल्याने तो 'ब्रुम..बा..' असं काहीसं ओरडत होता. पण या चिमुरड्याचा जयघोष करण्याचा प्रयत्न आणि स्टाईल साऱ्यांचेच मन जिंकून घेताना दिसला. तो व्हिडीओ काल पुन्हा एकदा व्हायरल झाला.
चिमुरड्याचा बोबड्या बोलीत जयघोष, पाहा Video-
Jasprit #Bumrah fans right now!
— Mohit Thakur (@Mohit_Thakur23) July 13, 2022
Bumraaaaaahhhhh 😃 #INDvsENGpic.twitter.com/lXXFCB5TKS
दरम्यान, इंग्लंडचा आपल्याच भूमीवर एकतर्फी पराभव झाला. जसप्रीत बुमराहने १९ धावांत ६ बळी टिपले. त्याच्या आजवरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. इंग्लंडच्या वरच्या फळीतील महत्त्वाच्या फलंदाजांना त्याने माघारी धाडले. तसेच गरज पडल्यावर इंग्लंडच्या शेपटालाही ठेचले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था अतिशय वाईट झाली होती. असे असतानाही इंग्लंडने 'दर्यादिली' दाखवत जसप्रीत बुमराहचा त्याच्या कामगिरीसाठी सन्मान केला. ज्या चेंडूने त्याने पराक्रम केला, तो चेंडू (Match Ball) बुमराहला स्पेशल गिफ्ट म्हणून देण्यात आला.