KBC: 2 हजार रुपयांच्या नोटेत GPS सिस्टीम, KBC च्या प्रश्नाचा व्हिडिओ तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 02:04 PM2022-06-13T14:04:59+5:302022-06-13T15:20:04+5:30
‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या पर्वाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर नवीन नोटा बाजारात येणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. यावेळी, एका वृत्तवाहिनीच्या निवेदकांनी चर्चा करताना 2 हजार रुपयांची नवीन नोट चलनात येणार असल्याचं सांगितलं होतं. या बातमीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता, पुन्हा एकदा त्या व्हिडिओची चर्चा होत आहे. कारण, बिग बी अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या शोमध्ये एक प्रश्न विचारला. त्यावर, हॉट सीटवरील सहभागी महिलाने दिलेल्या उत्तराने अनेकांना हसू आवरेना.
‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या पर्वाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. सध्या, हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून या प्रोमोमध्ये चुकीची बातमी देणाऱ्या न्यूज चॅनेलना अमिताभ यांनी टोला लगावल्याचे दिसून येते. प्रोमोच्या सुरुवातीला अमिताभ हॉट सीटवरील स्पर्धकाला प्रश्न विचारतात की, यापैकी कशात जीपीएस ट्रॅकर आहे. अर्थातच, या प्रश्नासाठी ४ ऑप्शन देण्यात आले आहेत. त्यामध्ये, पहिला पर्याय होता A) टाइपरायटर, B) दूरदर्शन, C) उपग्रह, D) २ हजार रुपयांची नोट.
अमिताभ यांच्या प्रश्नावर महिला स्पर्धक गुड्डी यांनी मोठ्या आत्मविश्वासाने २ हजारची हे D ऑप्शनचे उत्तर दिले. मात्र, हे उत्तर चुकीचे ठरले. त्यावर अमिताभ बच्चन गुड्डी यांना म्हणतात की, तुमचे उत्तर चुकीचे आहे. त्यावेळी, गुड्डी यांनी वृत्तवाहिनीवर पाहिलेल्या व्हिडिओची आठवण सांगितली. त्यानंतर अमिताभ बच्चनही गडबडून गेले. मात्र, त्यांनी लगेचच त्या चुकीच्या बातमीने नुकसान तुमचे झाले, असे म्हणत गुड्डीला उत्तर दिले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, वृत्त वाहिनीच्या व्हायरल व्हिडिओत चर्चा करताना, ही नोट जीपीएस सिस्टीमने जोडलेली असेल, त्यामुळे सॅटलाईटद्वारे त्याचा सिग्नल संबंधित यंत्रणांपर्यंत पोहचेल, असे महिला निवेदकांकडून सहकाऱ्यांना सांगण्यात येत होते.