युवकाला शिक्षण अर्धवट सोडून खोदावी लागतेय विहिर; १० तास मजुरी करुन मिळतात ३०० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 01:34 PM2020-08-10T13:34:01+5:302020-08-10T13:35:32+5:30
संदीपच्या शिक्षणासाठी स्थानिक शिक्षक अनेकदा मदत करतात. त्याची आई दुसऱ्याच्या घरी काम करते. भावांना शिक्षण घेता यावं म्हणून संदीपने पुढील शिक्षण सोडलं.
कोरोनामुळे अनेक लोकांच्या कामधंद्यावर परिणाम झाला आहे. देशात लॉकडाऊन घोषित केल्यापासून मजुरी करणाऱ्या कामगारांचे जगणं कठीण झालं आहे. कोरोना महामारीमुळे लोकांच्या आयुष्यावर विपरित परिणाम झाला आहे. यातच अलीकडेच १२ वीची परीक्षा दिलेल्या संदीप कुमार या युवकाला लॉकडाऊनमुळे पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असूनही ती पूर्ण करता येत नाही.
लॉकडाऊनमुळे संदीपला त्याचे शिक्षण अर्धवट सोडायला लागले आणि घरची हालाखीची परिस्थिती असल्याने विहिर खोदण्याचं काम करावं लागत आहे. पंजाबमधील लुधियाना येथील ही कहाणी आहे. मानकी गावात राहणाऱ्या संदीपने सरकारी शाळेतून १२ वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. १२ वीच्या पुढे त्याला शिक्षण घेण्याची इच्छा होती. पण ते होऊ शकलं नाही. त्यामुळे लॉकडाऊन कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्याला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं.
संदीपला विहिर खोदकाम करण्यासाठी दिवसाला ३०० ते ३५० रुपये मिळतात. केवळ संदीपच नव्हे तर त्याचा छोटा भाऊ मनदीप, जो सध्या १२ वी मध्ये आहे त्यालाही कुटुंबासाठी मजुरी करावी लागते. या दोघांचे वडीलही मजूर आहेत. सकाळी ८ वाजता कामाला जाणारा संदीप संध्याकाळी ६ वाजता काम संपवून घरी परततो. या १० तासांमध्ये तो विहिर खोदण्याचं काम करतो. संदीपला पुढे संगणकाचा कोर्स करायचा आहे. पण वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याला शिक्षण घेता येत नाही. विहिर खोदण्याच्या कामासाठी आम्हाला दिवसाला ३००-३५० रुपये दिले जातात असं त्याने सांगितले.
संदीपच्या शिक्षणासाठी स्थानिक शिक्षक अनेकदा मदत करतात. त्याची आई दुसऱ्याच्या घरी काम करते. भावांना शिक्षण घेता यावं म्हणून संदीपने पुढील शिक्षण सोडलं. लॉकडाऊन काळात त्याने शेती करण्यावरही भर दिला आहे. मानकी गावातील सरकारी शाळेतील उपमुख्याध्यापक दलजीत सिंग म्हणतात की, संदीप पुढील शिक्षण अर्धवट सोडत आहे त्यामुळे आम्ही हैराण आहोत. मागील काही दिवसांपासून ऑनलाईन शिक्षण सुरु झालं आहे पण संदीपच्या भावांना ते शिक्षण घेता येत नाही. शाळेकडून आम्ही संदीप आणि त्याच्या भावांना शिक्षणासाठी जेवढी मदत करता येईल तेवढी केली जाईल. सध्या संदीपचे दोन भाऊ आणि बहिण शिक्षण घेत आहेत तर तो मजुरी करत आहे.