जेव्हा २७ वर्षाच्या शांतनूला स्वत: रतन टाटा फोन करून विचारतात, 'माझा असिस्टंट होशील का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 12:26 PM2019-11-21T12:26:08+5:302019-11-21T12:27:55+5:30
देशातील लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबत काम करणं ही कुणासाठीही एक मोठं स्वप्न पूर्ण होण्यासारखी बाब आहे. त्यात जर स्वत:हून रतन टाटा तुम्हाला फोन करून त्यांच्यासोबत काम करणार का?
देशातील लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबत काम करणं ही कुणासाठीही एक मोठं स्वप्न पूर्ण होण्यासारखी बाब आहे. त्यात जर स्वत:हून रतन टाटा तुम्हाला फोन करून त्यांच्यासोबत काम करणार का? विचारत असतील तर....असं ज्या व्यक्तीसोबत घडलं असेल तो आनंदाच्या सातव्या शिखरावर असेल. असंच काहीसं २७ वर्षीय शांतनू नायडू या तरूणासोबत घडलं आहे. फेसबुकवर 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'च्या माध्यमातून शांतनूने त्याची ही स्वप्नवत घटना शेअर केली आहे.
गेल्या बुधवारी शांतनूची कहाणी फेसबुकवर शेअर करण्यात आली आणि पाहता पाहता केवळ १९ तासात ही पोस्ट २० हजारपेक्षा अधिक लोकांनी पसंत केली. १.७ के पेक्षा अधिक लोकांनी ही पोस्ट शेअर केली. यात त्याने सांगितले की, कशाप्रकारे ५ वर्षापपूर्वी त्यांची रतन टाटांसोबत भेट झाली होती.
त्यांच्या भेटीचा आणि कुत्र्यांचा संबंध
त्याने सांगितले की, पाच वर्षांआधी रस्त्यावर भटक्या कुत्र्यांच्या मृत्यूमुळे त्याच्या मनाला फार चटका लागला होता. यावर काहीतरी उपाय म्हणून शांतनूला एक आयडिया सुचली. त्याने भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात रिफ्लेक्टर्स असलेले कॉलर्स लावायला सुरूवात केली. याने ड्रायव्हर्सना रस्त्यावरील कुत्रे दूरून दिसतात. म्हणजे त्यांचे अपघात टाळता येतात. शांतनूच्या या कामाचं चांगलंच कौतुक झालं आणि टाटा ग्रुप ऑफ कंपनीजच्या न्यूजलेटरमध्येही त्याची माहिती देण्यात आली होती.
रतन टाटा यांचं पत्र...
शांतूनने सांगितले की, 'त्यावेळी माझ्या वडिलांनी मला रतन टाटा यांना पत्र लिहण्याचा सल्ला दिला. आधी तर मला काही सुचलं नाही. पण नंतर मी त्यांना पत्र लिहिलं आणि दोन महिन्यांनी त्या पत्राचं उत्तर मिळालं. स्वत: रतन टाटा यांनी मला भेटायला बोलवलं होतं. अर्थात यावर विश्वास बसायला बराच वेळ गेला'. काही दिवसांनी रतन टाटा यांच्या ऑफिसमध्ये दोघांची भेट झाली. आणि ही भेट शांतनूचं आयुष्य बदलणारी ठरली.
शिक्षणासाठी परदेशात रवाना
शांतनूने सांगितले की, रतन टाटा यांनी त्याच्या कामाचं फार कौतुक केलं. तसेच त्यांनी शांतनूच्या भविष्यातील प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याचही मान्य केलं. त्यानंतर शांतनू त्याची मास्टर्स डिग्री पूर्ण करण्यासाठी परदेशात गेला. पण जाता जाता शांतनूने त्यांना आश्वासन दिलं की, तो परत आल्यावर टाटा ट्रस्टसोबत काम करेल.
रतन टाटांचा पुन्हा फोन
शांतनूने सांगितले की, 'मी भारतात परत आल्यावर मला त्यांचा फोन आला. त्यांनी विचारले की, माझ्या ऑफिसमध्ये बरंच काम आहे. तू माझा असिस्टंट होशील का? अर्थात माझ्यासाठी हे स्वप्नवत होतं. मी एक मोठा श्वास घेतला आणि लगेच होकार दिला'.
१८ महिन्यांपासून करतोय काम
शांतनू गेल्या १८ महिन्यांपासून रतन टाटा यांच्यासोबत त्यांच्या ट्रस्टसाठी काम करतो आहे. तो म्हणाला की, 'मला आताही विश्वास बत नाहीये की, मी माझं स्वप्न प्रत्यक्षात जगतोय. माझ्या वयातील लोक चांगले मित्र आणि गुरू शोधण्यात किती काय सोसतात. मी नशीबवान आहे की, मला ही संधी मिळाली. रतन टाटा हे सुपरह्यूमनपेक्षा कमी नाहीत'.