Lata Mangeshkar Chalk Art Viral Video: छोटाशा खडूवर साकारल्या लता दीदी! कलाकाराने लता मंगेशकर यांना वाहिली अनोखी श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 04:05 PM2022-02-08T16:05:25+5:302022-02-08T16:08:48+5:30
लतादीदींनी रविवारी जगाचा निरोप घेतल्यानंतर चाहत्यांनी विविध प्रकारे त्यांना आदरांजली वाहिली.
Lata Mangeshkar Chalk Art Viral Video: भारतरत्न लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. रविवारी सकाळी वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली. सोशल मीडियावर लोक लतादीदींना आपापल्या शैलीत आदरांजली वाहताना दिसत आहेत. अनेक लोक त्यांनी गायलेली गाणी गाऊन त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत, तर काही व्हिडिओ संदेश सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना आदरांजली वाहताना दिसत आहेत. याचदरम्यान एका कलाकाराने लता मंगेशकर यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. एका छोटाशा खडूच्या तुकड्यावर लतादीदी साकारणाऱ्या या कलाकाराची सारेच प्रशंसा करत आहेत.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कलाकार खडूच्या तुकड्यावर लता मंगेशकर यांची छोटीशी मूर्ती कोरताना दिसत आहे. या कलाकाराने ज्या सफाईने आणि वेगाने हे चित्र कोरलं आहे ते पाहता त्याची प्रतिभा नक्कीच अलौकिक आहे असं म्हटलं पाहिजे. सचिन संघे असे या कलाकाराचे नाव असून त्यानेच हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्याने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला साडे तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हजारो लोकांनी व्हिडिओला लाइक आणि रिट्विटदेखील केले आहे. पाहा व्हिडीओ-
Humble tributes to legendary #LataMangeshkar Ji🙏
— Sachin Sanghe (@SachinSanghe) February 6, 2022
A quick miniature sculpture of #LataDidi#OmShantipic.twitter.com/c26MMv7gR0
रविवारी लता मंगेशकर यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्या ९२ वर्षांच्या होत्या. अनेक अवयव निकामी झाल्याने म्हणजेच मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ६ फेब्रुवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.