VIDEO: हा खरा हुशार! सिंह करणार होता शिकार; तितक्यात झेब्रा गुदगुल्या करून पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 10:27 AM2021-11-03T10:27:27+5:302021-11-03T10:28:53+5:30
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ; जंगलाच्या राजाला झेब्र्याकडून चकवा
वन्य जीवनात दररोज जीवन मरणाचा प्रश्न असतो. प्राण्यांना एकमेकांनापासून असलेला धोका कायम असतो. प्रत्येक पावलावर संकट असतं. कधीकधी शिकाऱ्याचीच शिकार होते. तर कधी सावजच शिकाऱ्यावर भारी पडतं. प्रत्येक क्षणाला सतर्क राहणारा आणि शक्तीला युक्तीची जोड देणारा प्राणीच जंगलात जिवंत राहू शकतो. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.
झेब्रा आणि सिंह यांच्यातील संघर्षाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सिंहाच्या जबड्यातून सुटका करून घेत झेब्र्यानं स्वत:चा जीव वाचवला. सिंहाला चकवा देण्यासाठी झेब्र्यानं वापरलेली हुशारी वाखाणण्याजोगी आहे. झेब्रा नदी किनारी पाणी पिण्यासाठी आला असताना सिंहानं त्याच्यावर हल्ला केला. सिंहानं धाव घेत झेब्र्याला पकडलं. सिंहानं त्याचे दात झेब्र्याच्या मानेजवळ घुसवले.
— عالم الحيوان (@Animal_WorId) October 20, 2021
झेब्रा बराच वेळ सुटकेसाठी प्रयत्न करत होता. मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही. एक वेळ अशी आली की झेब्रा पूर्णपणे थकला. त्यानं शरणागती पत्करली. मात्र शेवटचा उपाय म्हणून झेब्र्यानं त्याच्या मानेनं सिंहाला स्पर्श केला. झेब्र्यानं अचानक केलेल्या कृतीमुळे सिंहाची पकड काहीशी सैल झाली. झेब्र्यानं हीच संधी साधली आणि तिथून पळ काढला. ऍनिमल वर्ल्ड नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे सिंहानं झेब्र्यावर हल्ला केला, त्यावेळी झेब्र्यांचा कळप तिथेच होता. मात्र कोणीही झेब्य्राच्या मदतीसाठी पुढे सरसावलं आहे. झेब्र्यावर सिंहानं केलेला हल्ला संपूर्ण कळप पाहत होता. मदतीला कोणीच येत नसल्याचं पाहून झेब्र्याची झुंज तोकडी पडू लागली. मात्र शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचा प्रत्यत देत झेब्र्यानं स्वत:ची सुटका करून घेतली.