Lockdown:…अन् ३ वर्षाच्या चिमुरडीला थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोन लावतात; ऑडिओ क्लीप व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 12:07 PM2020-06-09T12:07:19+5:302020-06-09T12:36:23+5:30
एका तीन वर्षाच्या चिमुकलीला सोशल डिस्टेंसिंगचं पालन करण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी प्रेमळपणे ओरडले, त्या तीन वर्षाच्या अंशिका शिंदेच्या वडिलांना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन लावला.
मुंबई – राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांसाठी चिंतेची बाब बनली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना संकट काळात राज्याची धुरा उत्तमरित्या सांभाळत असल्याचं सर्वच स्तरातून कौतुक होतं. त्याचसोबत अनेकांना त्यांनी केलेलं मार्गदर्शन मोलाचं ठरतं, म्हणूनच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लोकप्रियतेच्या यादीत सर्वोच्च स्थान मिळवलं आहे. याचचं उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून पाहायला मिळालं.
एका तीन वर्षाच्या चिमुकलीला सोशल डिस्टेंसिंगचं पालन करण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी प्रेमळपणे ओरडले, त्या तीन वर्षाच्या अंशिका शिंदेच्या वडिलांना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन लावला. मुख्यमंत्र्यांचा आलेला फोन पाहून आई-वडिलांनाही सुखद धक्का मिळाला. उद्धव ठाकरेंची ही ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियात गाजत आहे. अनिष्का शिंदे या व्हिडीओ उद्धव ठाकरेंना काका म्हणताना दिसत आहे.
"लॉकडाऊन काळात दूधवाल्या काकांना पैसे देणाऱ्या चिमुकलीवर आई रागवली. उद्धव काकांनी सांगितलेली गोष्ट तू ऐकली ना आहेस, मी त्यांना तुझे नाव सांगते. असा दम देखील त्या चिमुकलीला दिला, याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर या घटनेची दखल थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. आणि स्वतः फोन करून पुन्हा गोंडस अंशिकाला रागावू नका, अशी सूचना तिच्या आई-बाबांना दिली. तसेच तिला उद्धव काका खूप आवडतात असंही पालकांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तिच्या वडिलांना फोन लावला. यात त्यांनी तुम्ही आमच्या शिवसैनिकांना का त्रास देताय? असं हसत विचारताच. यानंतर मुख्यमंत्री अंशिका शिंदे हिच्याशी बोलतात, तुला दम देतात, माझ्या नावानं? तुला पुन्हा दम दिला तर माझ्याकडे तक्रार कर असं मुख्यमंत्री प्रेमाने तिच्याशी संवाद साधतात. मुख्यमंत्र्यांच्या संवादाचा हा व्हिडीओ सोशल माध्यमात व्हायरल होत आहे.
कोरोना आजाराच्या वाढत्या संसर्गामुळे देशासह राज्यात मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान या कालावधीत सर्वांनी घरीच राहून सुरक्षित राहावे असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री तसेच प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे. याची नोंद घरातील आबालवृद्धांनी घेतलेली आहे.
विश्रांतवाडी येथील विश्रांत सोसायटी येथे राहणाऱ्या अमोल व कांचन शिंदे यांच्या अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीने दोन दिवसांपूर्वी दारात उभे असणाऱ्या दूधवाल्या काकांना पैसे देण्याचा हट्ट केला. त्यावर रागावून तिच्या आईने तिला उद्धव काकांचे म्हणे तू ऐकत नाहीस का? असे सांगितले. मी उद्धव काकांनी सांगितलेले ऐकेन, पुन्हा असे करणार नाही हे चिमुकल्या अंशिकाने कबूल केले. शिंदे कुटुंबीयांच्या कौटुंबिक ग्रुपमध्ये हा व्हिडीओ व्हायरल झाला. तिच्या मामाने तो व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला. आणि बघता बघता चिमुकल्या अंशिकाचा हा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला.
त्यानंतर याची थेट नोंद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घेतली. आपल्या व्यस्त कार्यक्रमांमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून अंशिकाच्या आई-वडिलांशी संवाद साधला. अचानक झालेल्या या सर्व घटनाक्रमामुळे शिंदे कुटुंबीय भरून गेले होते. अंशिकाचा याच महिन्यात वाढदिवस आहे. तिने साठवलेले खाऊचे पैसे कोरोना संकटाच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये देणार असल्याचे तिच्या पालकांनी यावेळी सांगितले.