शौचालयाचा खड्डा खोदताना मजुरांना लागली लॉटरी; १३३ वर्षांचा जुना खजिना सापडला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 11:29 AM2022-07-20T11:29:38+5:302022-07-20T11:30:51+5:30
उत्तर प्रदेशमधील जोनपूर येथील मजुरांना शौचालयाचा खड्डा खोदताना काही खनिजे सापडली आहेत.
जोनपूर: अनेकवेळा अशी प्रकरणं समोर येत असतात ज्यामध्ये खड्डा खोदताना काही खजिना अथवा दुर्मिळ वस्तू सापडतात. अनेकांना अशी दुर्मिळ संपत्ती सापडते आणि अचानक त्यांचे नशीब चमकते अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. सध्या असेच एक प्रकरण खूप चर्चेत आलं आहे मात्र इथे खजिना सापडलेल्या व्यक्तीचे नशीब बदललं नाही. उत्तर प्रदेशातील मजुरांना शौचालयाचा खड्डा खोदताना खजिना सापडला. खनिजा सापडताच तो आपल्याला मिळावा म्हणून मजुर आपासात भिडले. विशेष म्हणजे मजुरांनी ते काम अर्धवट सोडून तिथून पळ काढला मात्र अखेर हे प्रकरण कोर्टात पोहोचले.
हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशमधील जोनपूर येथील आहे. इथे मछलीशहर शहरात मजुर एका शौचालयाचा खड्डा खोदत होते, यादरम्यान त्यांना खड्ड्यामद्ये तांब्याची नाणी असलेली पेटी मिळाली. नाणी पाहताच मजुरांनी दुसऱ्या दिवशी कामाच्या ठिकाणी हजेरी लावली परंतु एका मजुराने हा सर्व प्रकार मालकाच्या मुलाला सांगितला. यानंतर मुलाच्या मागणीनंतर मजुरांनी सर्व नाणी मालकाला दिली.
इंग्रजांच्या काळातील नाणी
दरम्यान, नाणी मिळाल्याचा प्रकार मजुरांनी आणि मालकाने अनेकांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी माहिती मिळाली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विचारणा केली. प्रथम त्यांनी माहिती देण्यास नकार दिला मात्र कठोरपणे विचारपूस केल्यानंतर ते कबुल झाले. यांनंतर पोलिसांना तिथे १० तांब्याची नाणी आढळली. माहितीनुसार, ही नाणी इंग्रजांच्या काळातील असून १८८९ ते १९१२ या काळातील असल्याचं बोललं जात आहे. पोलीस अद्यापही मजुरांकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.