तेरी मेहरबानियां! रुग्णालयाबाहेर चकरा मारणाऱ्या कुत्र्याला हुसकावल्यानंतरही गेला नाही, कारण...
By प्रविण मरगळे | Published: October 8, 2020 04:48 PM2020-10-08T16:48:23+5:302020-10-08T16:50:30+5:30
Nagpur Loyal Dog News: त्यानंतर एकेदिवशी तो श्वान रुग्णालयात आत येत एका रुमच्या खोलीत शिरला, रुग्णाच्या बेडजवळ जात त्याने भुंकण्यास सुरुवात केली.
नागपूर – अनेकदा आपण सिनेमात पाहिलं असेल पाळीव कुत्रा आपल्या मालकासाठी स्वत:चा जीवदेखील देतो, बॉलिवूडमध्ये असे खूप सिनेमे गाजले आहेत. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखला जातो, हे सांगण्याचं कारण म्हणजे गेल्या २ दिवसांपासून नागपूरच्या धंतोली परिसरात असलेल्या रुग्णालयाबाहेर एक कुत्रा सतत चकरा मारत असल्याचं निदर्शनास आलं.
हा कुत्रा कोणाला इजा पोहचवेल या भीतीने रुग्णालयातील कर्मचारी त्याला हुसकावून लावत होते, तरीही तो पुन्हा परतून रुग्णालयाच्या चौकटीत डोकावून पाहत असे, अनेकदा त्याला हुसकावलं पण तो रुग्णालयाच्या बाहेर गेला नाही असं एका डॉक्टरने सांगितले. खूप दिवस झाले असेच सुरु होते, थोड्या दिवसांनी कुत्रा रुग्णालयाच्या व्हरांड्यात येऊन बसला, त्याचे लक्ष रुग्णालयाच्या दारावर होते, एकदा त्याने आत येण्याचा प्रयत्न केला परंतु कर्मचाऱ्याने त्याला हुसकावून लावले. एका डॉक्टरला या कुत्र्याची दया आली, त्याने कुत्र्याला मायेने जवळ घेतले, त्यानंतर या कुत्र्याला कोणी अडवू नका असं त्यांनी कर्मचाऱ्यांना बजावले.
त्यानंतर एकेदिवशी तो श्वान रुग्णालयात आत येत एका रुमच्या खोलीत शिरला, रुग्णाच्या बेडजवळ जात त्याने भुंकण्यास सुरुवात केली, रुग्णाने त्याच्या डोक्यावर कुरवाळून थोडेसे थोपटले, मग श्वान बाहेर येऊन व्हरांड्यात बसला. अनेकांनी हे दृश्य कुतूहलाने पाहिले. त्यानंतर डॉक्टरांना समजले की, हा रुग्ण त्या श्वानाचा मालक आहे, आजारपणात मालकाला रुग्णालयात दाखल व्हावे लागले, त्यादिवसापासून श्वान रुग्णालयाच्या चकरा मारत होता. २ दिवस मालक दिसला नाही म्हणून तो बेचेन झाला. काहीही खात नव्हता, रुग्णालयापर्यंत त्याने मार्ग शोधून काढला. रुग्णालयात कर्मचारी हुसकावून लावत असल्याने तो बाहेरच बसला होता असं मालकाने सांगितले.