VIDEO: विमान हजार फुटांवर असताना आयफोन पडला अन् 'लय भारी' व्हिडिओ रेकॉर्ड झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 07:27 AM2020-12-17T07:27:03+5:302020-12-17T07:27:11+5:30
रियो डि जनेरोवरून उड्डाण करतेवेळी आयफोन हातातून निसटला
हातातून मोबाईल पडल्यावर अनेकांचा जीव टांगणीला लागतो. फोन सुरक्षित असल्याचं समजल्यानंतर, तशी खात्री पटल्यानंतरच जीव भांड्यात पडतो. त्यातही फोन महागडा असेल, तर मग विचारायलाच नको. फोनला काही होऊ नये यासाठी त्याला जीवापाड जपलं जातं. तो पडू नये यासाठी शक्य तितकी सर्व काळजी घेतली जाते. मात्र तरीही कधीतरी फोन हातून निसटतोच आणि मग जीव अक्षरश: मेटाकुटीला येतो.
ब्राझीलचे डॉक्युमेंटरी फिल्ममेकर इर्नेस्टो गॅलिओट्टो यांनी नुकताच असाच एक अनुभव घेतला. गॅलिओट्टो छोट्या विमानातून प्रवास करत असताना त्यांचा आयफोन खाली पडला. गॅलिओट्टो विमानाच्या खिडकीतून व्हिडिओ काढतेवेळी हवेचा वेग अतिशय जास्त होता. त्यामुळे त्यांच्या हातून फोन निसटला. गॅलिओट्टो रिओ डि जनेरोतील कॅबो फ्रियो बीचवरून उड्डाण करत असताना हा प्रकार घडला.
विहंगम दृश्यं टिपण्यासाठी बाहेर काढलेला आयफोन ६ एस हातातून पडताच गॅलिओट्टोंना चिंता वाटू लागली. इतक्या उंचावरून पडलेला फोन आता कसा मिळणार आणि मिळालाच तर त्याची अवस्था काय असेल, याचा विचार त्यांच्या डोक्यात येऊन गेला. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केला आहे. त्यात गॅलिओट्टो यांच्या मनाची घालमेल अगदी स्पष्ट दिसत आहे.
तीनशे मीटरवरून (९८४ फूट) खाली पडलेला फोन शोधण्यासाठी गॅलिओट्टो यांनी जीपीएसचा आधार घेतला. त्यातून त्यांना फोनचं लोकेशन समजलं. गॅलिओट्टो लगेच त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना सुखद धक्काच बसला. गॅलिओट्टो यांचा फोन उत्तम स्थितीत होता. स्क्रिन प्रोटेक्टर आणि कव्हरचं थोडं नुकसान झालं होतं. मात्र फोन व्यवस्थित सुरू होता. विशेष म्हणजे फोन खाली पडतानाचा व्हिडीओ त्यात रेकॉर्डदेखील झाला होता.