'चिल्लर'गिरी! ताज हॉटेलमध्ये जेवला अन् बिल भरताना चिल्लर मोजू लागला, नेमका प्रकार काय? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 11:04 AM2023-02-22T11:04:29+5:302023-02-22T11:05:28+5:30
एका प्रसिद्धीलोलुप तरुणानं काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं आणि बिल भरण्यासाठी चक्क चिल्लर टेबलवर मोजू लागला.
एखाद्या फाइव्ह स्टार किंवा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेलो की तुम्ही बिल कसं द्याल? आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का? कॅश देऊ आणि रोकड नसेल तर कार्डनं बिल भरता येईल इतकं सोपं आहे. पण एका प्रसिद्धीलोलुप तरुणानं काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं आणि बिल भरण्यासाठी चक्क चिल्लर टेबलवर मोजू लागला. कॉन्टेंट क्रिएटर सिद्धेश लोकरे यानं नुकतंच एका उच्चभ्रू रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं आणि बिल भरण्यासाठी चिल्लर मोजले. हा संपूर्ण प्रकाराचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे.
इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत सिद्धेश कॅप्शनमध्ये म्हणतो, “ताज हॉटेल मध्येही कांड केला यार. व्यवहार महत्त्वाचे आहेत, मग तो डॉलर्सचा असो किंवा चिल्लरचा". व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की सिद्धेश सूट-बूट घालून हॉटेलमध्ये प्रवेश करतो. मग मेनू आणि ऑर्डर पाहतो. पिझ्झा आणि मॉकटेल ऑर्डर करतो. पण जेवण झाल्यावर एक पिशवी काढतो आणि त्यातून नाणी मोजायला सुरुवात करतो. थोड्या वेळाने हॉटेलचे कर्मचारी येतात आणि त्यांच्या हातात तो हे चिल्लर सोपवतो.
व्हिडिओला ११ लाख व्ह्यूज
काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. तो शेअर केल्यापासून ११ लाख वेळा पाहिला गेला आहे आणि संख्या वाढतच आहे. आतापर्यंत १.२५ लाख लोकांनी लाइक केलं आहे. तसेच, अनेक कमेंट्स आल्या आहेत. काही लोकांनी त्याचा हा प्रयोग 'मनोरंजक' असल्याचं म्हटलं आहे तर काहींनी यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ शकते असं म्हणत टीका केली आहे.
अनेकांनी व्यक्त केली नाराजी
एका व्यक्तीनं म्हटलं की, तुम्ही तुमच्या प्रयोगासाठी लोकांवर कसा त्रास देऊ शकता? पण शेवटी स्टाफला काही फरक पडला नाही, हे पाहून मला खूप आनंद झाला. दुसऱ्याने लिहिलं की, सर्व काही ठीक आहे पण नाणी मोजणं कर्मचाऱ्यांसाठी योग्य नाही. मला आशा आहे की तुम्ही याबद्दल माफी मागितली असेल. तुम्ही स्वतंत्र आहात, याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणासाठीही अडचणी निर्माण कराल.