Shocking! उकळत्या तेलात हात घालून काढली गरम भजी आणि पेपरवर टाकुन दिली ग्राहकाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 08:01 PM2022-05-04T20:01:16+5:302022-05-04T20:05:31+5:30
एखादी व्यक्ती या कढईतील उकळत्या तेलातच हात घालून पदार्थ तळत असेल तर... साहजिकच फक्त सांगून यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र सध्या असा एक शॉकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
गरमागरम भजी, वडा प्रत्येकाला आवडतो. पण हे पदार्थ बनवता तेलातून निघणारी वाफही सहन होत नाही. तेलाचा एक थेंब जरी अंगावर उडाला तरी किती चटका लागतो तुम्हाला माहिती असेल. मग विचार करा, जर एखादी व्यक्ती या कढईतील उकळत्या तेलातच हात घालून पदार्थ तळत असेल तर... साहजिकच फक्त सांगून यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र सध्या असा एक शॉकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Man taking out pakoda from boiling hot oil by hand).
एक व्यक्ती चक्क हाताने तेलात भजी तळतो आहे. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती दाल पकोडा विकतो आहे. त्याच्यासमोर भलीमोठी कढई आहेत. त्यात भजी टाकलेल्या आहेत. तेलातून बुडबुडे येत आहेत, वाफा येत आहेत. त्यावरूनच तेल किती गरम आहे हे दिसून येतं. उकळतं तेल पाहून आपल्या अंगावरच काटा येतो.
इतक्यात एक ग्राहक येतो आणि ही व्यक्ती त्या ग्राहकाला भजी देण्यासाठी हातात एक कागद घेते. आता कढईतील गरमागरम भजी त्याला द्यायची आहे, त्यासाठी तो त्या चमच्याने काढणं अपेक्षित होतं. पण ही व्यक्ती थेट आपला हातच त्या उकळतं तेल असलेल्या कढईत टाकते. हातांनी काही भजी तेलातून बाहेर काढते आणि कागदावर ठेवते.
हरीश गोस्वामी नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ छत्तीसगडच्या रायपूरजवळील आहे. इथल्या बस स्टँडवरील हा दाल पकोडा विक्रेता आहे. हा विक्रेता इतक्या सहजरित्या तेलात हात टाकून भजी काढतो जणू काही त्याच्यासाठी ते उकळतं तेल नव्हे तर साधं पाणीच आहे. त्याच्या चेहऱ्यावर बिलकुल भीती नाही. गरम तेलात हात टाकताना काय काळजी घ्यायला हवी ही टेक्निक या व्यक्तीला माहिती असावी. ही व्यक्ती आपल्या या कौशल्यात किती पारंगत झाली आहे हेच यावरून समजतं.