Lockdown: लॉकडाऊनमध्ये बाहेर पडण्यासाठी इतकं भन्नाट कारण आतापर्यंत कोणीच दिलं नसेल, पोलिसांनाही हसू आवरलं नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 09:26 AM2021-06-03T09:26:03+5:302021-06-03T09:27:50+5:30
या व्यक्तीला पोलिसांनी पकडले असता त्याने बाहेर पडण्याचं जे कारण सांगितले ते ऐकून पोलिसांनाही हसू आवरलं नाही.
कोरोना महामारीमुळं (Corona Pandemic) देशातील अनेक भागत लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अशात गरज असेल तरच लोकांना बाहेर पडता येऊ शकतं. परंतु हे अत्यावश्यक काम केवळ आपल्यासाठी नाही तर प्रशासनालाही पटेल असं असायला हवं. कर्नाटकच्या(Karnatak) गडग जिल्ह्यात एक मजेशीर घटना घडली आहे. ज्याठिकाणी राज्यव्यापी लॉकडाऊन असताना एक व्यक्ती घराबाहेर पडला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला.
या व्यक्तीला पोलिसांनी पकडले असता त्याने बाहेर पडण्याचं जे कारण सांगितले ते ऐकून पोलिसांनाही हसू आवरलं नाही. त्यानंतर पोलिसांनीही त्या व्यक्तीला भन्नाट उत्तर दिलं. हा व्यक्ती पोलिसांना म्हणाला की, माझ्या कोंबडीच्या पोटात दुखतंय तिला डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन चाललोय असं सांगितले. या व्यक्तीच्या अजब तर्काने पोलिसांनाही हसू आवरलं नाही. या व्यक्तीला पोलिसांनी पुन्हा घरी जाण्यास सांगितले परंतु लॉकडाऊन काळात विविध शक्कल लढवणारी माणसं पोलिसांना भेटली त्यातलं सर्वात गमंतीदार उत्तर देणारा हा पहिलाच भेटल्याने पोलिसही आनंद घेत होते. या कोंबडीवर घरातच उपचार कर असं सांगून पोलिसांनी त्याला पुन्हा घरी पाठवलं.
"माझ्या कोंबडीच्या पोटात दुखतंय तिला डॉक्टरांकडे नेतोय" लॉकडाऊनमध्ये बाहेर पडलेल्या व्यक्तीचं पोलिसांना भन्नाट कारण. कर्नाटकातील व्हिडीओ जोरदार व्हायरल #Police#Coronaviruspic.twitter.com/8R8sF9h2bJ
— Lokmat (@MiLOKMAT) June 3, 2021
कोंबडीच्या पोटात दुखतंय कळालं कसं?
आता तुम्हीही हा विचार करत असाल की, त्या व्यक्तीला कोंबडीच्या पोटात दुखतंय कसं कळालं किंवा कोंबडीच्या पोटातही दुखू शकतं असा प्रश्न व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात येऊ शकतो. याचं उत्तर देण्यासाठी एकानं ब्लॉग शेअर केलाय त्यात दावा आहे की, कोंबडी कधीकधी माणसांप्रमाणे खूप जास्त प्रमाणात जेवते. त्याचमुळे माणसांप्रमाणे तिच्याही पोटात दुखू लागलं असेल. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर युजर्स अनेक प्रतिक्रिया देत आहेत. बहुतांश लोकांना हसू आवरत नाही तर काहींना गमंत म्हणून खरंच कोंबडीच्या पोटात दुखत असेल तर? असा प्रश्न केला आहे.
लोकांच्या भन्नाट आयडिया
असो, सध्यातरी लॉकडाऊन काळात अनेक लोक घरातून बाहेर पडण्यासाठी विविध बहाणे आणि युक्त्या लढवताना दिसून येतात. हे पहिल्यांदाच नाही तर याआधीही लोकांनी लॉकडाऊनमध्ये बाहेर पडण्यासाठी विनोदी बहाणे बनवले आहेत. काही आठवड्यांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये एका व्यक्तीने लॉकडाऊन काळात गळ्यात एक पोस्टर बांधून मी मिठाई खरेदी करण्यासाठी जात आहे असं लिहिलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला पकडलं त्याला चांगलेच सुनावले आणि पुन्हा घरी पाठवले होते.