नशीब फळफळलं! आधी जिंकली ७६ लाखांची लॉटरी, आता पुन्हा लागला कोट्यवधींचा जॅकपॉट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 11:28 AM2021-12-17T11:28:10+5:302021-12-17T11:29:34+5:30
'देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड़ के', असं म्हटलं जातं आणि अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये एका नागरिकाला याचीच प्रचिती अनुभवायला मिळत आहे.
वॉशिंग्टन-
'देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड़ के', असं म्हटलं जातं आणि अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये एका नागरिकाला याचीच प्रचिती अनुभवायला मिळत आहे. कारण या व्यक्तीनं एकदा नव्हे, तर दोनवेळा लॉटरी जिंकली आहे. वर्जीनिया (Virginia) येथील सफोकचे (Suffolk) रहिवासी एल्विन कोपलँड (Alvin Copeland) यांनी १ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ७.६ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. विशेष म्हणजे याआधी त्यांनी २००२ साली देखील ७६ लाख रुपयांची लॉटरी जिंकली होती. दोन वेळा एल्विन यांचं नशिब फळफळलं आणि त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे.
एल्विन कोपलँड यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सफोक येथील सेव्हन-इलेव्हन स्टोअरमधून Cash4Life चं तिकीट खरेदी केलं होतं. एल्विन आजवर ठराविक क्रमांकावरच बोली लावत आले आहेत आणि यावेळीही त्यांनी क्रमांक बदलला नाही. तिकीट खरेदी केल्यानंतर त्यांना कळालं की ४ डिसेंबर रोजीच्या ड्रॉ साठी त्यांनी बोली लावलेले ८-११-२५-४५-४८ हे पाच क्रमांक अचूक ठरले आहेत. यानंतर एल्विन यांचं आयुष्यच पालटलं. जवळपास ७.६ कोटी रुपयांची लॉटरी एल्विन यांनी जिंकली आहे. जिंकलेली रक्कम आपल्या कुटुंबीयांवर खर्च करणार असल्याचं एल्विन यांनी सांगितलं.
"माझ्या नशीबानं मला दुसऱ्यांना साथ दिली. याआधी २००२ साली ७६ लाख रुपयांची लॉटरी मला लागली होती. त्यावेळी मी २ डॉलर खर्चून तिकीट खरेदी केलं होतं. पण त्यावेळी मला अंदाज नव्हता की माझं नशीब मला साथ देईल आणि मी लॉटरी जिंकेन", असं एल्विन म्हणाले. एकाच व्यक्तीनं दुसऱ्यांदा लॉटरी जिंकल्यानं अनेकजण हैराण देखील झाले आहेत.