वर्षातून केवळ २ दिवस काम, ८० हजार कमाई; फक्त बल्ब बदलण्याची जबाबदारी, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 04:42 PM2022-02-09T16:42:19+5:302022-02-09T16:42:40+5:30
हे काम जोखमीचं असल्यानं त्यासाठी गिर्यारोहक अथवा टॉवर इंजिनिअरची नियुक्ती केली जाते.
पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही काम करावं लागतं. कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तर काही जणांच्या नोकऱ्यांवर अद्यापही टांगती तलवार आहे. कोरोना काळात परदेशी कंपनीच्या सीईओंनी झूम कॉलवरुन एका झटक्यात ९०० हून अधिक लोकांना जॉबवरुन काढलं होतं. कोरोनामुळे नोकरी गमावलेले बेरोजगार सध्या नोकरीच्या शोधात आहेत.
मात्र काही काम असं असते जे करण्यासाठी लोकं धजावतात. २ हजार फूट उंचावर चढायचं आणि त्याठिकाणी रेडिओ स्टेशनचा बल्ब बदलण्याचं हे कामही धाडसी आहे. कारण हे काम करणं म्हणजे साक्षात मृत्यूच्या दारात जाण्यासारखं आहे. सोशल मीडियात एका व्यक्तीचा रेडिओ स्टेशनवरील बल्ब बदलण्याच्या कामाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिला तर तुमच्याही अंगावर काटा येईल. रेडिओ टॉवरवरील एक लाइट बल्ब बदलण्यासाठी १७०० ते २००० फूट उंचीवर जावं लागतं. काही लोकं मनात म्हणत असतील हे काम न केलेलेच बरे.
जोखीम असलेलं काम करण्यास नकार
हे काम जोखमीचं असल्यानं त्यासाठी गिर्यारोहक अथवा टॉवर इंजिनिअरची नियुक्ती केली जाते. हा कर्मचारी टॉवरच्या उपकरणावर देखरेख आणि दुरुस्तीचं काम करतो. त्या दुर्घटना थांबवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी हार्नेसचा वापर केला जातो. कारण खाली पडल्यास थेट मृत्यूच होऊ शकतो. कुठलाही अपघात थांबवण्यासाठी योग्य त्या सुरक्षेच्या नियमांनुसार काम चालते. रेडिओ टॉवरची उंचीशिवाय हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला हवा आणि प्रत्येक वातावरणाचा सामना करावा लागतो.
सोशल मीडियावर टॉवर वर चढण्याचा व्हिडीओ व्हायरल
इन्स्टाग्रामवर किथ विलियम्सनं हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्याबद्दल माहिती दिली आहे की, याठिकाणी वर्षातून केवळ २ वेळा लाइटबल्ब बदलण्याची गरज भासते आणि त्यासाठी कर्मचाऱ्याला ४० हजार रुपये दिले जातात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.