VIDEO: काय सांगता, पिंपळाला लागलाय आंबा? व्हिडीओ तुफान व्हायरल झाला अन् भलताच प्रकार समोर आला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 01:01 PM2021-06-04T13:01:35+5:302021-06-04T13:02:16+5:30
निसर्गाचा चमत्कार म्हणत अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ
तुम्ही कधी पिंपळाच्या झाडावर आंबा पाहिलाय? नाही ना? पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. पिंपळाच्या झाडावर आंबा लागल्याचा दावा व्हिडीओसोबत केला जात आहे. हा व्हिडीओ जवळपास दीड मिनिटांचा आहे. हा व्हिडीओ उत्तराखंडच्या ऋषीकेशमधील असल्याचा दावा आहे. ऋषीकेशच्या त्रिवेणी घाटाजवळ असलेल्या पोलीस चौकीजवळील पिंपळाच्या झाडावर तीन आंबे पाहिल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे, असा मजकूर व्हिडीओसोबत आहे.
सोशल मीडियावर सध्या पिंपळाच्या झाडाच्या व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हॉट्स ऍप, ट्विटर, फेसबुक सगळीकडेच हा व्हिडीओ पाहायला मिळत आहे. पिंपळाच्या झाडाला आंबे हा चमत्कार असल्याचा अनेकांचा दावा आहे. मात्र सत्य वेगळं आहे. व्हायरल व्हिडीओसोबत केला जाणारा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं पडताळणीत समोर आलं.
ऋषिकेश में त्रिवेणीघाट पुलिस चौकी के सामने,,पीपल के पेड़ पर आम लगे है,समझ से बाहर है,,? pic.twitter.com/NlrRfBMtD2
— sanjay suryavansi )) jai hind.... (@SanjayS17005055) June 2, 2021
काही दिवसांपूर्वी या परिसरात वादळ आलं होतं. सोसाट्याचा वारा सुटल्यानं जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाच्या काही फांद्या तुटल्या आणि त्या पिंपळाच्या फांद्यांमध्ये जाऊन अडकल्या. आंब्याच्या झाडाच्या तुटलेल्या फांद्यांना आंबे लागलेले होते. ते पिंपळाच्या फांद्यांवर अडकले. त्यामुळे पिंपळाला आंबे लागल्यासारखं चित्र दिसू लागलं. याचा व्हिडीओ काहींनी काढला आणि तो पुढे व्हायरल झाला.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक पिंपळाच्या झाडावर आंबे लटकत असल्याचं चित्र दिसतं. त्यासोबतच त्यात एक होर्डिंग दिसत आहे. त्यावर 'श्री गंगा सभा' असं लिहिलं आहे. ऋषिकेशमधील त्रिवेणी घाटाची देखभाल करण्याचं काम श्री गंगा सभा करते. त्यांच्याकडूच परिसरात आरती केली जात आहे. त्या होर्डिंगवर श्री गंगा सभेचे कार्यकारी अध्यक्ष राहुल शर्मांचा फोन नंबर आहे. त्यांच्याशी एका हिंदी वृत्तवाहिनीनं संवाद साधला. तेव्हा पिंपळाच्या झाडाला आंबे लागल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं.