पिचाई सर, Gmail चा पासवर्ड विसरलोय; युजरनं थेट सीईओंकडे मदत मागितली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 01:17 PM2021-04-28T13:17:49+5:302021-04-28T13:20:40+5:30
जीमेलचा पासवर्ड विसरलेल्या व्यक्तीनं थेट गुगलच्या सीईओंकडे मागितली मदत
नवी दिल्ली: कधी कधी आपण सोशल मीडिया अकाऊंट्स, ई-मेल अकाऊंट्सचा पासवर्ड विसरतो. अशा परिस्थितीत फॉरगॉट पासवर्डचा वापर करून नवा पासवर्ड तयार करता येतो. यामुळे अवघ्या काही मिनिटांत पासवर्डची समस्या दूर होते. नवा पासवर्ड तयार करून आपलं अकाऊंट वापरता येतं. जी-मेलचा पासवर्ड विसरल्यावर कोणी थेट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी संपर्क साधत नाही. पण एका जीमेल वापरकर्त्यानं आपली समस्या थेट गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंना सांगितली आणि मदतीचं आवाहन केलं.
भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहे. देशातील आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आहे. ऑक्सिजन सिलिंडर, रेमडेसिविर इंजेक्शन, औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे जगभरातून भारतासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुंदर पिचाईंनी भारतासाठी मदतीची घोषणा केली. त्यांनी ट्विट करून मदतीची माहिती दिली. त्यांच्या ट्विटला एका ट्विटर वापरकर्त्यानं उत्तर दिलं.
VIDEO: चल बाहेर निघ! लग्न लागत असताना पोलीस आले मंडपात; धक्के मारत काढली नवरदेवाची 'वरात'
'हॅलो सर, तुम्ही कसे आहात? मला जीमेल आयडी पासवर्डबद्दल एक मदत हवी आहे. पासवर्ड कसा रिसेट करायचा ते मी विसरलो आहे. कृपया मदत करा,' असं आवाहन @Madhan67966174 नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्यानं केलं. या व्यक्तीला पिचाईंनी उत्तर दिलेलं नाही. मात्र अन्य वापरकर्त्यांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. मूळचे भारतीय असलेल्या सुंदर पिचाईंनी गुगलच्या वतीनं भारताला १३५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.