ऐकावं ते नवलच! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अजब फतवा; नेहमी हसत राहा अन्यथा भरावा लागेल दंड!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 02:56 PM2022-07-15T14:56:21+5:302022-07-15T14:57:33+5:30
फिलीपिन्स मधील महापौराने आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारताच एक नवीन पॉलिसी लागू केली आहे.
नवी दिल्ली: प्रत्येक देशात आपापले वेगळे कायदे आहेत, ज्याचे लोकांना काटेकोरपणे पालन करावे लागते. मात्र अनेक भागांमध्ये वेळोवेळी नियम बदलले जातात. सध्या एका देशात असा नियम लागू करण्यात आला आहे ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या नवीन नियमांबद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल, कारण या देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नेहमी हसत राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
माहितीनुसार, ही घटना फिलीपिन्स येथील आहे, इथे एका महापौराने स्थानिक स्तरावर हा अजब नियम लागू केला आहे. या नियमांसाठी महापौरांनी एक नवीन पॉलिसी तयार केली असून त्याचे नाव स्माइल पॉलिसी असे ठेवण्यात आले आहे. या पॉलिसीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना नेहमी हसत राहण्याचा सल्ला दिला जात आहे. जर कोणी या पॉलिसीचे पालन केले नाही तर त्याला शिक्षा दिली जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांनी चांगले वर्तन करावे. तसेच जेव्हा ते कामावर येतील तेव्हा त्यांना आनंदी वातावरणात वावरता यावे, यासाठी हा नियम लागू करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. महापौर ॲरिस्टोटल अगुरी यांना स्थानिक स्तरावर सुधारणा करायची आहे.
नेहमी हसत राहा अन्यथा भरावा लागेल दंड
क्वेझॉन प्रांतातील मूलेन टाउनमध्ये आपल्या पदाचा पदभार स्वीकारताच स्माइल पॉलिसी आणून महापौरांनी सर्वांचे लक्ष वेधले. या पॉलिसीचे सर्वच कर्मचाऱ्यांना पालन करावे लागेल, आम्हाला माहिती मिळाली होती की, स्थानिक स्तरावर चांगले व्यवहार होत नव्हते त्यामुळेच ही पॉलिसी लागू करण्यात आली असल्याचे महापौरांनी स्पष्ट सांगितले. महापौर बनण्यापूर्वी ॲरिस्टोटल अगुरी या एक थेअर एक्सपर्ट राहिल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वर्तनात बदल करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे आता या पॉलिसीचा कर्मचाऱ्यांवर काय आणि किती परिणाम होतो ते पाहण्याजोगे असेल. या पॉलिसीची जगभर चर्चा रंगली असून लोक महापौरांचे कौतुकही करत आहेत.