लय भारी! स्वतःचे दागिने विकून 'ती'नं जिम उघडली; अन् काही दिवसात जगप्रसिद्ध झाली, थक्क करणारा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 12:36 PM2020-08-27T12:36:15+5:302020-08-27T12:46:52+5:30
या महिलेचा प्रवास थक्क करणारा तसंच प्रेरणादायी आहे.
भारतात अजूनही अनेक स्त्रिया लग्न झालं की आपले मुलं, घर संसार यात व्यस्त होतात. परिणामी स्वतःचं करिअर, पर्सनॅलिटी याकडे पाहायला वेळ मिळत नाही. खूप कमी स्त्रींयाना आपलं घरं सांभाळून नोकरी करण्याची किंवा आपला छंद जोपासण्याची संधी मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत. ही महिला फिटनेस ट्रेनर आहे. लग्न झाल्यानंतर या महिलेनं आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. लग्न झाल्यानंतर चूल आणि मूल यात अडकत असलेल्या विचारांना तिनं टक्कर दिली आहे. या महिलेचा प्रवास थक्क करणारा तसंच प्रेरणादायी आहे.
Humans Of Bombay ने दिलेल्या माहितीनुसार या महिलेचं नाव किरण देंबला आहे. किरण यांनी सांगितले की, ''लग्नानंतर मी चार भींतींच्या आत कैद झाले होती. सकाळी लवकर उठायचं, कुटुंबासाठी जेवणं बनवायचं असा दिनक्रम १० वर्ष सुरू होता. मी वेगळं काहीच करत नसल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली. त्यानंतर मी लहान मुलांचे संगीत क्लासेस घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी माझी शारिरीक स्थिती ठीक नव्हती. माझं वजन २५ किलोंनी वाढलं होतं. म्हणून मी जिमला जाण्याचं ठरवलं.''
पुढे त्यांनी सांगितले की, ''घर सांभाळून वर्कआऊट करणं मी सुरू केलं. सकाळी लवकर उठून मुलांचे आवरून त्यांना शाळेत सोडायला जावं लागत होतं. असं असतानाही ७ महिन्यात माझं २४ किलो वजन कमी झालं.''
एकेदिवशी त्यांनी आपल्या पतीला सांगितले की, ''मला स्वतःची जिम ओपन करायची आहे''. नंतर जिमसाठी एक गाळा भाड्यानं घेऊन मीनी जिम उघडण्यात आली. जिम सुरू करण्यासाठी त्यांनी आपले दागिने गहाण ठेवले आणि कर्जही काढलं. काही दिवसांनी संपूर्ण कॉलनीतील लोकांना या जिमबद्दल माहिती मिळाली.
हळूहळू किरण यांनी स्वतःला बॉडी बिल्डींग स्पर्धेसाठी तयार करायला सुरूवात केली. त्याचवेळी किरण यांचे सासरे देवाघरी गेल्यानं दुःखाचा डोंगरा कोसळला. या कठीण प्रसंगात त्यांनी आपल्या मुलांचा सांभाळ केला. त्यानंतर स्पर्धेसाठी तयार झाल्या. विशेष म्हणजे या स्पर्धेत किरण यांनी ६ वा क्रमांक पटकावला. आता किरण यांचे वय ४५ आहे. फोटोग्राफर आणि फिटनेस ट्रेनर आहेत. यांचा प्रेरणादायी प्रवास थक्क करणारा असून प्रत्येक महिलेसाठी आशेचा किरण दाखवणारा ठरलेला आहे.
हे पण वाचा-
'हंबरून वासराले चाटती जवा गाय', गाडीखाली सापडलेल्या वासराला लोकांनी वाचविले अन्...
सलाम! कधीही विसरणार नाही रात्रंदिवस राबणाऱ्या कोरोनायोद्ध्याचं बलिदान; मन हेलावून टाकणारा फोटो