Microsoft मध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर, लाखो रुपये पगार; वीकेंडला चालवतो ऑटोरिक्षा, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 04:53 PM2024-07-25T16:53:22+5:302024-07-25T16:59:00+5:30
सध्या सोशल मीडियावर या व्यक्तीची खुप चर्चा सुरू आहे. याने नोकरीसोबतच ऑटो चालवण्याचे काम का सुरू केले? जाणून घ्या...
Microsoft Techie Bengaluru : एकटेपणावर घालवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टीत गुंतून राहण्याचा प्रयत्न करतात. पण, बंगळुरुतीला एका आयटी इंजिनिअरने एकटेपणावर मात करण्याचा अनोखा मार्ग निवडला आहे. दिग्गज आयटी कंपनी Microsoft मध्ये काम करणारा हा इंजिनीअर वीकेंडला चक्क ऑटो रिक्षा चालवतो. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरुमध्ये लाखो आयटी इंजिनीअर काम करतात. या लाखोंच्या गर्दीतही अनेकजण एकाकी आयुष्य जगतात. याच एकाकीपणावर मात करण्यासाठी मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणाऱ्या 35 वर्षीय इंजिनीअरने अनोखा मार्ग निवडला. विशेष म्हणजे, या इंजिनीअरला लाखो रुपयांमध्ये पगार आहे, तरीदेखील तो बंगळुरुच्या रस्त्यांवर रिक्षा चालवतोय. यावरुनच समजते की, तो हे काम पैशांसाठी नाही, तर एकटेपणा दूर करण्यासाठी करतोय.
Met a 35 year old staff software engineer at Microsoft in Kormangala driving Namma Yatri to combat loneliness on weekends pic.twitter.com/yesKDM9v2j
— Venkatesh Gupta (@venkyHQ) July 21, 2024
व्यंकटेश गुप्ता नावाच्या युजरने हा फोटो 'X' वर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ऑटो चालवणाऱ्या इंजिनीअरचा चेहरा दिसत नाही, तसेच त्याचे नावही समोर आले नाही. पण, व्हायरल फोटोमध्ये एक व्यक्ती मायक्रोसॉफ्ट कंपनीची हुडी घालून ऑटो चालवताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. छोट्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांनी असे काम करणे सामान्य आहे. पण, मायक्रोसॉफ्टसारख्या नामांकित कंपनीतील इंजिनीअरने हे काम केल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
HCL च्या इंजिनियरने रॅपिडो बाईक चालवली
बंगळुरुमधील आयटी इंजिनीअरने अशाप्रकारे काम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी हिंदुस्तान कॉम्प्युटर्स लिमिटेड, म्हणजेच HCL च्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने नोकरीवरून काढून टाकल्यानंतर रॅपिडो बाइक चालवली होती. त्याचीही सोशल मीडियावर चर्चा झाली होती. एकटेपणा हे एक कारण आहेच, पण सेकंड इनकमसाठी अनेकजण अशाप्रकारची कामे करतात. गेल्या काही काळापासून महागाई वाढत असल्यामुळे एकाचवेळी दोन काम करणे सामान्य बाब झाली आहे.