साहब मै मजबूर हूँ... गावी जाण्यासाठी मजुराने चोरली सायकल अन् ठेवली चिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 16:18 IST2020-05-18T16:14:04+5:302020-05-18T16:18:39+5:30
एका मजूराने आपल्या गावी जाण्याकरीता सायकलची चोरी केली आहे.

साहब मै मजबूर हूँ... गावी जाण्यासाठी मजुराने चोरली सायकल अन् ठेवली चिठ्ठी
कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जास्तीत जास्त लोकांना कोरोना विषाणूंची लागण होण्यापासून वाचवण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असल्यामुळे काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेक मजूरांनी आपल्या घरची वाट धरली आहे. अनेक संटकाचा सामना करत प्रवासी मजूर आपापल्या घरी पोहोचत आहेत.
सोशल मीडियावर अशीच एक घटना व्हायरल होत आहे. एका मजूराने आपल्या गावी जाण्यासाठी सायकलची चोरी केली आहे. फक्त सायकल चोरली नाही तर आपल्या मालकाला पत्र सुद्धा लिहिलं आहे. या पत्रात असं लिहिलं आहे की, गावी जाण्यासाठी सायकल चोरी करावी लागली.
चोरीनंतर मजुराने लिहिलेल्या या माफीनाम्यात चोरीचं कारणही सांगितलं आहे.ही चिठ्ठी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातल्या बरेलीत राहणाऱ्या मजुराला त्याच्या मुलासह घरी जायचं होतं. पण जाण्यासाठी काही व्यवस्था नव्हती तेव्हा त्याने सायकलची चोरी केली आणि मालकासाठी पत्र लिहिलं.
या चिठ्ठीत लिहिलेला मजकूर 'नमस्कार.. मी तुमची सायकल घेऊन जात आहे. शक्य असल्यास तर मला माफ करा. कारण माझ्याकडं कोणतंच वाहन नाही. माझा एक मुलगा आहे त्याच्यासाठी मला हे करावं लागलं. तो दिव्यांग आहे आणि चालू शकत नाही. आम्हाला बरेलीला जायचं आहे. तुमचाच मजबूर मजदूर'. डोळ्यात पाणी आणणारं या कामगार मजूराचं पत्र आहे.
आई-बाबाला सायकल रिक्षातून गावी घेऊन निघाला ११ वर्षांचा श्रावणबाळ, पाहा व्हायरल व्हिडीओ
लय भारी! उन्हाळात राबणाऱ्या जवानासाठी बनवली छत्री; पाहा 'या' छत्रीची खासियत न्यारी