Monsoon Picnic: पावसाळी सहलीला जा, पण ती 'शेवटची' ठरणार नाही याची काळजी घ्या; वाचा 'ही' कथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 03:13 PM2024-07-01T15:13:44+5:302024-07-01T15:15:54+5:30

Monsoon Picnic: पावसाचा आनंद घेताना छोट्याशा कृतीने आनंदावर विरजण पडणार नाही याची काळजी घ्या; वाचा एका आईने घातलेली आर्त साद!

Monsoon Picnic: Go on a monsoon picnic, but make sure it's not the 'last' one; Read the true story! | Monsoon Picnic: पावसाळी सहलीला जा, पण ती 'शेवटची' ठरणार नाही याची काळजी घ्या; वाचा 'ही' कथा!

Monsoon Picnic: पावसाळी सहलीला जा, पण ती 'शेवटची' ठरणार नाही याची काळजी घ्या; वाचा 'ही' कथा!

लोणावळ्यात एकाच कुटुंबातले पाच जण वाहून गेल्याची घटना ताजी असताना ताम्हिणी घाटात आणखी एक तरुण वाहून गेला. अशा घटना वाचताना अंगावर काटा येतो. परंतु, अशा बेजवाबदार वागण्याला लोक नावं ठेवतात आणि आपली वेळ आली की कळत नकळत त्याच चुका करतात. पावसाळा आनंद देणाराच असतो, पण निसर्गासमोर मर्यादेतच राहायला हवे, याची जाणीव करून देणारी एक भावनिक आणि काळजाला हात घालणारी कथा नक्की वाचा. 

>> अक्षय भिंगारदिवे

त्या : अक्षय बोलतोय?
मी : हो.
त्या : खूप सरळ, साधं आणि सोपं लिहितोस बाळा.
मी  धन्यवाद. 
त्या : मी तुझा कॉन्टॅक्ट नंबर आठवडाभर शोधला. 
मी : फेसबुकवर एक मेसेज केला असता तरी..
त्या : अरे फेसबुक नाही वापरत मी.
मी : मग लेख कुठे वाचले?
त्या : आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मैत्रीण शेअर करत असते. 
मी : ओके.
त्या : मलाही माझं आयुष्य बदलवणारा एक अनुभव शेअर करायचा आहे. 
मी : ओके. 
त्या : विषय नाही विचारणार?
मी : नाही.
त्या : का?
मी : माझ्या आईने एखादा अनुभव शेअर करायची इच्छा व्यक्त केली असती, तर तिलाही विषय नसता विचारला.
त्या : तुम्ही मुलं ना खूप हट्टी असता. कधीच आम्हा वेडपट आयांचं ऐकत नाही. 
मी : अगदी सहमत.
त्या : अक्षय सर्वांना पावसाळा आवडतो.    
मी : हो. कारण पावसाळा नवचैतन्य घेऊन येतो.
त्या : मला मात्र पावसाळा अजिबात आवडत नाही.
मी : का?
त्या : सांगते.
मी : ओके.
त्या : आमचं त्रिकोणी कुटुंब.
मी : ओके.
त्या : मी, माझे मिस्टर आणि सौरभ.
मी : सौरभ म्हणजे मुलगा?
त्या : हो. २७ वर्षांचा. अगदी तुझ्यासारखा.. 
मी : म्हणजे?
त्या : साडेपाच फूट उंच, बडबड्या, पॅशनेट, सर्वांना मदत करणारा आणि.. 
मी : आणि?
त्या : आणि.. मी बोलतच राहील.
मी : आईची माया.
त्या : १५ ऑगस्ट २०१६  
मी : कसली तारीख?
त्या : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सौरभ आणि त्याच्या मित्रांनी फिरायला जाण्याचा प्लॅन केला.  
मी : ओके.
त्या : म्हणूनच दरवर्षीप्रमाणे अगदी सकाळपासून मी चौकशी करत बसलेले.
मी : कसली?
त्या : किती जण जाणार आहात? गाडी कुठली आहे? ड्रिंक करणारे किती जण आहेत? गाडी कोण चालवणार आहे?
मी : मग?
त्या : सौरभने सांगितलं होतं की, ६ जण जाणार आहोत. २ जण ड्रिंक करणारे आहेत. मात्र ते ड्रायव्हिंग करणार नाहीत.
मी : ओके.
त्या : त्यानंतर सौरभला मी बजावलंदेखील होतं. 
मी : कशाबद्दल? 
त्या : पोहता येत नसल्याने, खोल पाण्यात उतरू नको.
मी : साहजिकच.
त्या : त्याने नेहमीप्रमाणे होकारार्थी मान डोलावली आणि बॅग उचलून तो घराबाहेर पडला. 
मी : ओके. 
त्या : रात्री ९ वाजेपर्यंत घरी येईल, असं सौरभने जाताना सांगितलं होतं. 
मी : ओके.
त्या : रात्रीचे १० वाजून गेल्यावरही सौरभ घरी न आल्याने, मला काळजी वाटायला लागली होती. 
मी : मग?
त्या : घरी यायला उशीर होणार असेल, तर सौरभ फोन करून हमखास कळवायचा. 
मी : त्यादिवशी?
त्या : त्यादिवशी त्याचा नंबर नॉट रिचेबल होता.
मी : ओके.
त्या : मी रात्री ३ वाजेपर्यंत त्याची वाट बघत जागी होते. मात्र मग त्यांनतर माझा डोळा लागला.   
मी : ओके.
त्या : सकाळी उठले तर मिस्टर घरी नव्हते, आणि माझी नणंद, बहीण आणि जाऊबाई घरी आलेल्या होत्या.
मी : ओके.
त्या : सौरभ अजूनही घरी न आल्याने, मी अस्वस्थ झालेली होते. 
मी : साहजिकच.
त्या : त्यात ही सर्व लोकं अचानक घरी आल्याने, मनात नको नको ते विचार येत होते.  
मी : बरोबर.
त्या : अखेरीस दुपारी १ वाजता मला समजलं.
मी : काय?
त्या : सौरभच्या गाडीचा अपघात झाल्याने त्या सर्वांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे.
मी : अरे..
त्या : ती बातमी कळल्यापासून तर, मी वेड्यासारखी रडत होते. काहीही करून मला सौरभला पाहायचं होतं.
मी : काळजी..
त्या : मात्र सर्वांनी मला समजवण्याचा प्रयत्न केल्याने, अखेरीस मी देवासमोर हात जोडून उभी राहिले.
मी : आई..
त्या : माझ्या सौरभला सुखरुप घरी आण, एवढीच प्रार्थना तेव्हा मी देवापुढे करत होते.
मी : जसा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता, तशी माझी अस्वस्थता वाढत होती. 
त्या : अखेरीस साडेपाच वाजता मला बिल्डिंगच्या खाली मोठा गोंधळ ऐकू आला. 
मी : मग?
त्या : मला काहीच सुचत नसल्याने, मी गर्दीच्या दिशेने धावत निघाले.  
मी : मग?
त्या : अक्षय तुझा विश्वास बसणार नाही.. 
मी : कशावर?
त्या : माझ्या सौरभला त्या लोकांनी गाठोड्यात आणलेलं. 
मी : OMG
त्या : मला माझे मिस्टर म्हणाले की, सौरभ आपल्याला सोडून गेला. 
मी : नाही सहन होत. 
त्या : कसा विश्वास ठेवणार, तूच सांग..
मी : आईचं काळीज.
त्या : मला शेवटचं पाहता पण नाही आलं माझ्या लेकराला.
मी : नियती.
त्या : अक्षय मी त्या घटनेनंतर जिवंत प्रेत बनले होते.
मी : मानसिक धक्का.  
त्या : हो. त्यातून बाहेत यायला मला ३ वर्षे लागली.
मी : हॅट्स ऑफ.
त्या : जगायची इच्छाच उरली नव्हती.
मी : आठवणींच्या रूपात, सौरभ कायम तुमच्या सोबतच आहे. 
त्या : म्हणून तर कारण शोधलं.
मी : कसलं?
त्या : अपघाताचं. 
मी : काय झालेलं?
त्या : दिवसभर मौजमस्ती करून संध्याकाळी सौरभ आणि त्याचे मित्र जेवायला एका ढाब्यावर थांबलेले.
मी : मग?
त्या : तिथे त्यांच्यापैकी काही मित्रांनी ड्रिंक केलेली.
मी : ओके.
त्या : दारूच्या नशेत त्यातल्या एकाने गाडी चालवण्याचा हट्ट केला.
मी : मग?
त्या : बाकीच्या मित्रांनी खूप समजावलं, मात्र त्याने काही ऐकलं नाही.
मी : च्यामारी.
त्या : रात्री जोरदार पाऊस चालू होता आणि त्यात तो मुलगा नशेत. 
मी : मग?
त्या : रस्त्यात बंद पडलेला ट्रक त्याला दिसलाच नाही. 
मी : अरे..
त्या : तरी अखेरच्या क्षणी त्याने स्वतःची बाजू वाचवली आणि गाडीची दुसरी बाजू ट्रकला धडकली.
मी : बाप रे..
त्या : ६ पैकी २ जण जागेवर गेले, त्यात माझा सौरभ होता. 
मी : दुर्दैव.
त्या : जगलेल्या चौघांपैकी दोघांना अजूनही व्यवस्थित चालता बोलता येत नाही. आयुष्याचं अपंगत्व.. 
मी : वाईट. 
त्या : पावसाळा सुरु झाला की, तुम्ही मुलं हमखास फिरायला निघता.
मी : हो.
त्या : मात्र खबरदारी किती जण घेतात?
मी : विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
त्या : पावसाळ्यात धबधब्याजवळ सेल्फी काढताना कित्येक जण पडतात, बुडतात आणि जखमी होतात.
मी : पावसाळ्यात रोज बातम्या वाचायला मिळतात.
त्या : स्कुटी स्लिप होतात, मोठ्या गाड्यांचे भीषण अपघात होतात.
मी : बरोबर.
त्या : मी स्वतः दरवर्षी पर्यटनस्थळांना भेट देऊन, प्रशासनाच्या या गोष्टी निदर्शनास आणून देते. 
मी : पुढाकार.
त्या : मी माझा सौरभ गमावला, तसा कुठल्या आईने तिचा मुलगा किंवा मुलगी गमवायला नको, एवढीच इच्छा आहे. 
मी : तुम्हाला ती वेदना ठाऊक आहे.
त्या : मुलांनी स्वच्छंद बागडावं, फिरावं आणि आयुष्याचा मनसोक्त आनंद घ्यावा. 
मी : हो.
त्या : मात्र जबादारीचं भानही ठेवावं. 
मी : गरजेचं.
त्या : मुलं ही आई वडिलांची म्हातारपणाची काठी असतात. 
मी : आधार असतात.
त्या : तुमच्या क्षणिक सुखासाठी, आम्हाला आयुष्यभराची शिक्षा देऊन निराधार करू नका.
मी : करेक्ट.
त्या : कारण ज्यादिशी आजची तरुणाई मजा आणि माज या दोन शब्दातील फरक ओळखेल, त्याच दिवशी माझ्यासारख्या लाखो आयांना निर्धास्त झोप लागेल.
मी : ज्जे बात!

Web Title: Monsoon Picnic: Go on a monsoon picnic, but make sure it's not the 'last' one; Read the true story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.