आईच्या हाताचं अखेरचं जेवण, ताटासमोर बसून मुलगा धाय मोकलून रडला; काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 01:44 PM2023-12-22T13:44:32+5:302023-12-22T13:46:55+5:30
महिलेचा स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर ८ महिन्यांनी मुलाच्या वडिलांनी शेअर केलेला व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारा आहे.
देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली असे म्हणतात आणि जेव्हा एखाद्याच्या आईचे निधन होते, तेव्हा जीवन अंधारमय होते. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही म्हण मराठीत प्रसिद्ध आहे. अलीकडेच चीनमधील एका निष्पाप मुलाने आपली आई गमावली जी दीर्घकाळ कर्करोगाशी लढा देत होती.
महिलेचा स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर ८ महिन्यांनी मुलाच्या वडिलांनी शेअर केलेला व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. वास्तविक, यामध्ये मूल बराच वेळ ताटात ठेवलेले मोमोज बघत असते आणि रडत असते. मग तो ते खाण्यास नकार देतो आणि खोलीत पळून जातो. मुलाच्या वडिलांनी सांगितले की, हे मोमो त्यांच्या आईनं बनवलेला शेवटचा पदार्थ होता जो त्यांनी फ्रीझरमध्ये आजतागायत जपून ठेवला होता आणि शेवटी ते खराब होईल या भीतीने ते खाण्याचा निर्णय घेतला पण मुलगा ते खाण्यास तयार नव्हता आणि जोरजोरात रडायला लागला.
मुलानं खाण्यास दिला नकार
मुलगा आणि त्याचे वडील जेवणासाठी बसले होते. तेव्हा वडिलांनी मुलाला म्हटलं, बाळा हे मोमोज तुझ्या आईनं अखेरचे बनवले होते आनंदाने खा.हे ऐकताच तो मुलगा मोमोजकडे एकटक पाहत राहतो आणि ते खाण्याऐवजी तिथून रडून निघून त्याच्या खोलीत जातो.
वडिलांनी हा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केल्यानंतर नेटिझन्सही भावूक झाले. अनेकांनी त्यांच्या भावना कमेंट्समध्ये व्यक्त केल्या. एकानं लिहिलं की, मी त्या बिचाऱ्या मुलाचे दु:ख समजू शकतो. माझ्या आईनं अखेरचे बनवलेले जेवण मीदेखील ठेवले आहे. जेव्हा मला तिची आठवण येते तेव्हा मी ते फ्रिजरमधून काढून त्याचा सुगंध घेतो आणि पुन्हा फ्रिजरमध्ये ठेवतो. तर मोमोज खाऊन त्याचा आनंद घ्यायला हवा. तो त्याची टेस्ट आयुष्यभर विसरणार नाही असं एका युजरने सांगितले. दरम्यान, यापूर्वीही २०२१ मध्ये पूर्व चीनच्या जियांग्सू भागात पोलिसांनी एका मुलाला रात्री उशिरा रस्त्यावरून चालताना पाहिले. तो त्याच्या आईच्या कबरीवर जात होता. जे ऐकून अधिकाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.