मुसळधार पावसामुळे ट्रेनमध्येच कपडे वाळत घालून मुंबईकरांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 03:59 PM2022-07-15T15:59:38+5:302022-07-15T16:08:31+5:30
मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
मुंबई: मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सगळ्यांचे लक्ष जाते ते मुंबईच्या लाइफलाइनकडे अर्थात लोकल ट्रेनकडे. कारण मुसळधार पाऊस झाल्याने लोकल गाड्यांच्या सेवेमध्ये अडथळा निर्माण होतो. सध्या मुंबईतील लोकल ट्रेनमधील एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. कारण लोकल मधील प्रवाशांनी चक्क लोकलच्या डब्ब्यामध्ये शाल, बेडशीट आणि टॉवेल सुकत घातले आहेत.
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडीओ @dadarmumbaikar या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. 'हे फक्त आपल्या मुंबईत घडू शकते' असं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. एका युजरने कमेंट करत लिहले की, आमची मुंबई, तर दुसऱ्याने हे चित्र एखाद्या ऑलिम्पिकमधील झेंड्यासारखं असल्याचं म्हटलं. तर काही नेटकऱ्यांनी या लोकांची खिल्ली उडवली आहे तर काही लोक मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.
अनेक जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट जारी
दरम्यान, मागील आठवड्यापासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाचे सत्र सुरू आहे. त्यामुळे शहरातील ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. संततधार पावसामुळे, मागील आठवड्यापासून मुंबईतील पवई तलाव ओसंडून वाहत आहे तसेच दादरसारख्या भागात पाणी देखील साचले होते. प्रशासनाकडून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या भागांसाठी यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अति पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. "पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू असून मी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच सर्व अधिकारी माझ्या संपर्कात आहेत. आमचं सरकार लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.