रेल्वेत होते १०४ प्रवासी, बोगद्यात शिरताच अख्खी रेल्वे गायब झाली; गेली कुठे? आजवर न सुटलेलं कोडं!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 10:47 PM2023-03-25T22:47:15+5:302023-03-25T22:50:18+5:30
जग रहस्यमय घटनांनी भरलेलं आहे. कधी आकाशात उडणारे विमान गायब होतं तर कधी समुद्राच्या लाटांवर तरंगणारं संपूर्ण जहाज बेपत्ता होतं.
नवी दिल्ली-
जग रहस्यमय घटनांनी भरलेलं आहे. कधी आकाशात उडणारे विमान गायब होतं तर कधी समुद्राच्या लाटांवर तरंगणारं संपूर्ण जहाज बेपत्ता होतं. बेपत्ता होण्याचं हे गूढ हवेत आणि पाण्यातच नाही तर रेल्वे बोगद्यातही घडलं आहे. रेल्वेच्या कर्मचार्यांसह एकूण १०६ प्रवाशांसह धावणारी रेल्वे आजपर्यंत आपल्या निर्धारित ठिकाणी पोहोचू शकलेली नाही. संपूर्ण रेल्वे कुठे गेली हे कोणालाच कळू शकलेलं नाही. रेल्वेतील १०४ जणांचं काय झालं? याचं अनेक किस्से समोर आले, पण सत्य आजतागायत काही कळू शकलेलं नाही.
१९११ साली इटलीमध्ये एक रेल्वे रहस्यमयरीत्या गायब झाली होती. नवीन रेल्वेची रचना इटालियन कोच आणि इंजिन निर्माता झानेट्टी यांनी केली होती. रेल्वेच्या ट्रायलसाठी कंपनीनं लोकांना मोफत प्रवासासाठी आमंत्रित केलं होतं. त्यासाठी वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या होत्या. ट्रायलसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांसह १०६ लोक रेल्वेत चढले होते. काही मिनिटांतच रेल्वेनं वेग पकडला. एका बोगद्यातून रेल्वे जाणार होती. रेल्वे बोगद्यात शिरली, पण त्यातून बाहेरच आली नाही. प्रवासी पुढच्या स्टेशनवर वाट पाहात होते, पण रेल्वे काही आली नाही. बोगद्यात शिरताच रेल्वे कुठे गेली हे कोणालाच कळलेलं नाही.
कथा खूप पण सत्य माहित नाही
बोगद्यात प्रवेश केल्यानंतर रेल्वे गायब झाली होती. १०४ जणांचा ठावठिकाणा कळू शकला नाही. या घटनेत फक्त दोन जण वाचले. बोगद्यातून सुटलेले दोन्ही प्रवासी स्पष्टपणे काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते. एकानं याबद्दल कधीही काहीही सांगितलं नाही, तर दुसर्या प्रवाशानं लोकांना सांगितलं की जेव्हा ट्रेन बोगद्यात प्रवेश करत होती तेव्हा त्यांना पांढरा धूर दिसला. घाबरून त्यांनी चालत्या ट्रेनमधून उडी मारली. या घटनेची सत्यता आजतागायत शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांना शोधता आलेली नाही. वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. काही वर्षांनंतर, ट्रेनचा काही भाग जर्मनी आणि रशियामध्ये सापडल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत.
ही रेल्वे मेक्सिकोला पोहोचल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. तिथल्या एका डॉक्टरनं दावा केला की तिच्या हॉस्पिटलमध्ये १०४ लोकांना दाखल करण्यात आलं होतं. सर्व लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते, पण कोणाचीही प्रकृती बरी नव्हती. काही लोकांनी रेल्वे दोन पाहिल्याचा दावा केला. मात्र, आजपर्यंत त्याबाबत कोणतीही प्रमाणित माहिती मिळालेली नाही. सत्य हेच आहे की हे रहस्य अद्याप उलगडलेलं नाही आणि जगातील रहस्यमय घटनांमध्ये हे कोडं गुंतलेलं आहे.