Dubai Lottery: कार धुता धुता नशीब चमकले! रिक्षा चालकाचा मुलगा 21 कोटींची लॉटरी जिंकला, भावासाठी भावूक झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 06:15 PM2022-09-23T18:15:51+5:302022-09-23T18:16:40+5:30
काही दिवसांपूर्वी केरळच्या एका ऑटो रिक्षा चालकाला रातोरात लॉटरी लागली होती. भरत पुन्हा दुबईला जाऊन लॉटरीचे तिकीट खरेदी करणार आहे.
काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकाला करोडो रुपयांची लॉटरी लागल्याचे वृत्त आले होते. अधून मधून आखाती देशांमधून भारतीय नागरिक लॉटऱ्या जिंकल्याच्या बातम्या येत असतात. आता नेपाळी नागरिकाने दुबईत लॉटरी जिंकली आहे. महत्वाचे म्हणजे कार धुता धुता त्याचे नशीब चमकले आहे.
दुबईत भरत हा ३१ वर्षीय तरुण महजूज ड्रॉमध्ये २१ कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला आहे. भरत हा दुबईत करोडपतींच्या कार धुण्याचे काम करत होता. गेल्या तीन वर्षांपासून तो दुबईत आहे. त्याचे वडील भारतात रिक्षा चालवितात. त्याचा भाऊ लकवाग्रस्त असून त्याच्यावर दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत, त्याच्या उपचारासाठी बक्षीसाची रक्कम खर्च करणार असल्याचे भरत म्हणाला.
भरतच्या भावाला ब्रेन ट्युमर झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतू, यानंतर त्याला अर्धांगवायूचा झटका आला आणि शरीर पूर्णपणे लकवाग्रस्त झाले. त्याच्या उपचाराच्या खर्चासाठी भरत दुबईला गेला होता. तिथे तो लोकांच्या कार धुवून मिळालेल्या पैशांतून भावासाठी उपचाराची सोय करत होता. भरतला दोन मुलेही आहेत.
भरतसोबत त्याच्या दोन मित्रांनी मिळून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. एवढी मोठी लॉटरी जिंकणारा भरत पहिला नेपाळी ठरला आहे. भरत २७ सप्टेंबरला नेपाळला परतणार आहे. यानंतर पुन्हा तो दुबईला जाऊन लॉटरीचे तिकीट खरेदी करणार आहे. जॅकपॉट जिंकल्यानंतर त्याने कार धुण्याचे काम सोडणार की नाही हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.
काही दिवसांपूर्वी केरळच्या एका ऑटो रिक्षा चालकाला रातोरात लॉटरी लागली होती. थोडी थोडकी नाही तर थेट २५ कोटींची लॉटरी या रिक्षा चालकाला लागली होती. ओनम सणामध्ये ओनम लॉटरीचे आयोजन केले जाते. त्यात तो जिंकला आहे. ऑटो रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकणे कठीण बनले होते. यामुळे तो मलेशियाला कुकची नोकरी करण्यासाठी जाणार होता. त्यासाठी त्याने एक दिवस आधीच तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, दुसऱ्या दिवशीच त्याचे नशीब बदलले आणि तो रातोरात करोडपती झाला होता. या रकमेपैकी त्याला १० कोटी रुपये सरकारला कराच्या स्वरुपात देणे भाग होते.