श्रीमंतांनी आलिशान गाड्यांमधून रस्त्यावर उडवल्या नोटा; पैसे गोळा करायला लोकांची झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 12:15 PM2023-11-29T12:15:53+5:302023-11-29T12:17:16+5:30
लग्न समारंभाला जाण्यासाठी निघालेल्या या तरुणांनी सेक्टर-37 च्या रस्त्यावर अचानक चलनी नोटा उडवण्यास सुरुवात केली.
नोएडाच्या रस्त्यावर पुन्हा एकदा लोकांची पैसे गोळा करण्यासाठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं. काहींना आकाशातून या नोटांचा पाऊस पडला असं वाटलं. पण प्रत्यक्षात काही वेगळच घडलं आहे. काही श्रीमंतांनी हे असं केलं. लग्न समारंभाला जाण्यासाठी निघालेल्या या तरुणांनी सेक्टर-37 च्या रस्त्यावर अचानक चलनी नोटा उडवण्यास सुरुवात केली. यावेळी तेथून जाणाऱ्या लोकांनीही क्षणाचाही विलंब न लावता त्या नोटा गोळा करण्यास धाव घेतली.
अनेकांनी आपली वाहनं थांबवून पैसे जमा करून ते आपल्या खिशात भरले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. मात्र नोटा उडवणं तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. पोलिसांनी त्यांना चार लाखांचा दंड ठोठावला आहे. एकूण 12 वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. माहितीनुसार, प्रत्येक कारसाठी 33 हजार रुपयांचा दंड जारी करण्यात आलं आहे.
पैसे उडवण्याची ही काही पहिली घटना नाही. तीन दिवसांपूर्वीही अशीच एक घटना उघडकीस आली होती. आलिशान वाहनांचा ताफा येथून जात होता, त्यामध्ये बसलेल्या मुलांनी चलनी नोटा रस्त्यावर फेकल्या. सायरन वाजवला आणि कारच्या खिडकीतून बाहेर येऊन स्टंटबाजीही केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्या वाहनांना दंड ठोठावला आहे.
आता पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. पण यावेळी तरुणांनी वाहनातून चलनी नोटा हवेत फेकल्याने तेथे जमाव जमा झाला. रस्त्यावर पडलेल्या त्या नोटा रस्त्यावरून जाणाऱ्यांनी उचलून खिशात भरायला सुरुवात केली. हे सर्व श्रीमंत लोक एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी दिल्लीहून ग्रेटर नोएडाला जात होते, असे सांगण्यात येत आहे.