एक वर्षाची ‘डुप्लिकेट’ राणी एलिझाबेथ; चिमुरडीचा फोटो इंटरनेटवर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 06:34 AM2022-02-18T06:34:32+5:302022-02-18T06:37:14+5:30

खुद्द राणी एलिझाबेथ यांनीही याबद्दल त्या चिमुरडीचं कौतुक केलं आहे आणि आपल्या ‘हमशकल’, ‘डुप्लिकेट’ असलेल्या या दुसऱ्या राणीच्या पालकांना त्याबद्दल शुभेच्छांचं पत्र लिहिलं आहे.

One-year-old ‘duplicate’ Queen Elizabeth; little girl photo goes viral on internet | एक वर्षाची ‘डुप्लिकेट’ राणी एलिझाबेथ; चिमुरडीचा फोटो इंटरनेटवर व्हायरल

एक वर्षाची ‘डुप्लिकेट’ राणी एलिझाबेथ; चिमुरडीचा फोटो इंटरनेटवर व्हायरल

googlenewsNext

इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ आजकाल विशेष चर्चेत असतात. कधी त्यांच्या फिटनेसवरून, कधी ‘या’ वयातही कोरोनाला धोबीपछाड दिली म्हणून, कधी भारताच्या ‘कोहिनूर’ हिऱ्यावरून, तर कधी त्यांच्या हयातीतच प्रिन्स चार्लस् यांच्याकडे राजगादी सोपविण्याचा निर्णय घेतला म्हणून...

आताही राणी एलिझाबेथ चर्चेत आहेत, पण एका वेगळ्याच कारणावरून! त्यांच्यासारखीच दिसणारी, त्यांच्यासारखाच पेहराव करणारी, त्यांच्याप्रमाणेच कुत्रे घेऊन फिरणारी सोबतच्या छायाचित्रात दिसते ती  खरोखरची राणी नाही, तर ती आहे, एक वर्षाची चिमुरडी...
गेल्यावर्षी ‘हॅलोविन’च्या निमित्तानं तिनं केलेला हा वेश आणि तिचा फोटो सध्या खूपच व्हायरल होतो आहे. पश्चिमी देशात ‘हॅलोविन’ नावाचा एक खास सण साजरा केला जातो. या दिवशी लहान-मोठे सारेजण भुताखेतांचे घाबरवणारे पोशाख घालतात, तर काहीजण आपल्या आवडत्या, प्रसिद्ध व्यक्तीची नक्कल करताना त्यांच्यासारखाच पेहराव करतात. अमेरिकेच्या ओहायाे प्रांतातील जालेन सुदरलँड या एक वर्षाच्या चिमुरडीनं राणी एलिझाबेथ यांची नक्कल करताना, त्यांचं सारं व्यक्तिमत्त्व आपल्या फोटोत उतरवलं आहे. 

खुद्द राणी एलिझाबेथ यांनीही याबद्दल त्या चिमुरडीचं कौतुक केलं आहे आणि आपल्या ‘हमशकल’, ‘डुप्लिकेट’ असलेल्या या दुसऱ्या राणीच्या पालकांना त्याबद्दल शुभेच्छांचं पत्र लिहिलं आहे. राणी एलिझाबेथ यांचा जो आब या चिमुरडीनं फोटोतून दाखवला आहे, त्याला सध्या इंटरनेटवर सगळ्यांचीच दाद मिळते आहे. राणी एलिझाबेथ यांच्याविषयी जगभरात मोठा आदर आहे. राष्ट्रकुल परिषदेतील तब्बल १६ सार्वभौम देशांच्या त्या महाराणी आहेत. त्यांचे अधिकार मर्यादित आणि सामर्थ्य औपचारिक असलं, तरी वैधानिकदृष्ट्या या देशांच्या त्या सम्राज्ञी समजल्या जातात. 

राणी एलिझाबेथ यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी लंडन येथे झाला. त्यांचे वडील जॉर्ज हे राजेपदी असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ६ फेब्रुवारी १९५२ रोजी एलिझाबेथ यांना ‘राणी’ घोषित करण्यात आलं. तेव्हापासून गेली ७० वर्षे, आज वयाच्या ९५ व्या वर्षीही राजघराण्यावर एलिझाबेथ यांची सत्ता आहे. महाराणी एलिझाबेथ यांना चार अपत्ये असून, मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स हे राजघराण्याचे वारस आहेत.

केवळ एका फोटोमुळे या सगळ्या घटना या चिमुरडीनं ताज्या केल्या आहेत. जालेनची आई केटलिन सुदरलँड सांगतात, ‘हॅलोविन’साठी जालेनला कोणता पोशाख घालावा, यासाठी आमच्या घरी आणि नातेवाईकांमध्ये खूप चर्चा झाली. अनेक पर्याय तपासल्यानंतर आणि नाकारल्यानंतर जालेनला ‘राणी एलिझाबेथ’ बनवायचं ठरवलं. जालेनसाठीही ही व्यक्तिरेखा खूप सूट होणारी होती आणि झालंही तसंच. राणीच्या वेशभूषेसाठी बराच अभ्यास करण्यात आला. त्यांचं व्यक्तिमत्त्व जाणून घेण्या्त आलं. त्यानुसार जालेनला राणीसारखाच निळ्या रंगाचा कोट परिधान करण्यात आला. डोक्यावर ‘राणीच्या केसांचा विग’, त्यांच्यासारखीच टोपी, ब्रोच आणि राणीची जी मुख्य ओळख आहे, तो मोत्यांचा हारही जालेनला घालण्यात आला आणि तयार झाली एक वर्षाची छोटी राणी एलिझाबेथ! 

केटलिन सुदरलँड यांनी आपल्या मुलीचे हे फोटो सोशल मीडियावर टाकले आणि  ते प्रचंड व्हायरल झाले.  छोट्या जालेनचं कौतुक झालं. केटलिन यांनी सहज म्हणून जालेनचे हे फोटो राणी एलिझाबेथ यांनाही पाठवले. त्यांच्याकडून काही उत्तर येईल, जालेनचं त्या कौतुक करतील, याची जराशीही आशा त्यांना नव्हती; पण आश्चर्य म्हणजे राणी एलिझाबेथ यांनीही आपल्या छोट्या ‘राणी’ची दखल घेतली आणि त्यांच्यावतीनं सुदरलँड यांना एक पत्र आलं. हे पत्रही खूपच व्हायरल झालं. राणी एलिझाबेथ यांच्यावतीनं लेडी-इन-वेटिंग मॅरी मॉरिसन यांनी लिहिलेलं एक पत्र केटलिन यांना मिळालं आहे. त्यात लिहिलंय, महाराणी एलिझाबेथ यांनी जालेन यांचे ‘त्यांच्या वेशातील’ फोटो पाहिले. ते त्यांना फारच आवडले. त्या्बद्दल जालेन आणि त्यांच्या पालकांचं कौतुक करण्यासाठी एक पत्र लिहावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार हे पत्र तुम्हाला पाठवलं जात आहे. राणी यांनी तुमच्या पूर्ण कुटुंबाला शुभेच्छा तर दिल्या आहेतच, पण जालेननंही पुढे जाऊन खरोखर ‘महाराणी’ बनावं, जगानं आश्चर्यानं तोंडात बोट घालावं अशी कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जगात इतक्या मोठमोठ्या व्यक्ती असताना ‘आदर्श’ म्हणून तिने ‘माझी’ निवड केली, हा मी माझा बहुमान समजते, असं म्हणून राणीनं या पत्रात धन्यवादही दिले आहेत.

महाराणीकडे होते ३० कुत्रे !
जालेनच्या फोटोत दोन ‘कॉर्गीज’ कुत्रे दिसतात, ते महाराणी एलिझाबेथ यांचं खास वैशिष्ट्य! एलिझाबेथ यांनाही लहानपणापासूनच कॉर्गीजची खूप आवड होती. त्यांच्याकडे पूर्वी तीसपेक्षा जास्त कुत्री होती. आता मात्र महाराणीकडे त्यांचे एकच लाडके कुत्रे आहे. त्याचे नाव आहे ‘कँडी’!

Web Title: One-year-old ‘duplicate’ Queen Elizabeth; little girl photo goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.