वरकरणी दिसतात पांढऱ्या अन् काळ्या रंगाचे चौकोन पण नीट पाहताच सर्वांचा रंग सेम टु सेम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 06:29 PM2022-07-28T18:29:22+5:302022-07-28T18:32:25+5:30
सध्या तुमच्यासमोर असणारा फोटोदेखील अशाच प्रकारचा आहे. प्रथमदर्शनी वाटत नसलं, तरी यामधील A आणि B हे दोन चौरस एकाच रंगाचे आहेत.
ऑप्टिकल इल्युजन या प्रकारचे फोटो तुम्हाला माहिती असतील. पहिल्यांदा पाहिल्यानंतर यात जी गोष्ट दिसते, ती तशी नसून वेगळीच आहे हे नंतर आपल्या लक्षात येतं. कोडी म्हणून किंवा मनोरंजनासाठी अशा प्रकारची चित्रं तयार केली जातात. इंटरनेटवर ही चित्रं प्रचंड व्हायरल होत असतात. या चित्रांमधील वेगळ्या गोष्टीची उकल झाल्यानंतर कित्येक जण ‘अरेच्चा हे आपण पाहिलं कसं नाही’ अशी प्रतिक्रिया देतात. सध्या तुमच्यासमोर असणारा फोटोदेखील अशाच प्रकारचा आहे. प्रथमदर्शनी वाटत नसलं, तरी यामधील A आणि B हे दोन चौरस एकाच रंगाचे आहेत.
या चित्रामध्ये बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे एक बेस दिला आहे, ज्यामध्ये काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे काही चौरस आहेत. या बेसवरच आणखी एक वस्तूही आहे, जिची सावली यामधील काही चौरसांवर पडली आहे. यातील दोन चौरसांना A आणि B अशी नावं दिली आहेत. तसेच, हे दोन्ही चौरस एकाच रंगाचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल, की हे दोन्ही चौरस वेगवेगळ्या रंगाचे आहेत, तर तुम्ही चुकीचे आहात. टाइम्स नाऊ न्यूजने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
खरंतर हे ऑप्टिकल इल्युजन एडवर्ड एच. अॅडेलसन यांनी 1995 मध्ये तयार केलं होतं. एमआयटीच्या ब्रेन अँड कॉग्निटिव्ह विभागातील पर्सेप्च्युअल सायन्स ग्रुपच्या वेबसाईटवर हे अपलोड करण्यात आले होते. यामधील चौरस हे काळे-पांढरे नसून, करड्या रंगाच्याच वेगवेगळ्या शेड्स (Grey squares optical illusion) आहेत. पहिल्यांदा पाहिल्यानंतर कित्येकांना यातील A चौरस हा गडद करड्या रंगाचा, तर B चौरस हा हलका करड्या रंगाचा असल्याचा भास होतो. मात्र हे एकाच रंगाचे असल्याचा पुरावा देखील पुढे देण्यात आला आहे.