"माझा वेळ बर्बाद केल्याचे पैसे दे", डेट ठरली निष्फळ, मुलाने मुलीला पाठवले बिल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 01:07 PM2022-09-15T13:07:23+5:302022-09-15T13:08:21+5:30
"माझा वेळ बर्बाद केल्याचे पैसे दे म्हणते मुलाने मुलीला बिल पाठवले आहे.
नवी दिल्ली : हे सोशल मीडियाचे युग आहे इथे जवळपास सर्वच व्यवहार ऑनलाइन होत असतात. ऑनलाइन डेटिंगच्या देखील अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत, यावरून अनेक कपल्स आपला जोडीदार शोधत असतात. कपल्स एकत्र वेळ घालवण्यासाठी विविध ठिकाणी फिरायला जात असतात. मात्र आपल्या जोडीदारासोबत फिरायला जाऊनही ती डेट निष्फळ ठरली की अनेकांची चिडचिड होते. सध्या अशाच एका व्यक्तीचा वेळ वाया गेल्यामुळे त्याने भन्नाट शक्कल लढवली आहे. डेट निष्फळ झाल्यानंतर एका व्यक्तीने मुलीला इनव्हॉइस पाठवून वेळ वाया घालवल्याबद्दल भरपाई मागितली आहे.
मिररने दिलेल्या वृत्तानुसार, मियाना नावाच्या मुलीने स्वत: टिकटॉकवरील व्हिडीओद्वारे याबाबत खुलासा केला आहे. संबंधित तरूणीने व्हिडीओ शेअर करत याबद्दल भाष्य केले आहे. तिने एकदा एका मुलाला डेट केले होते आणि नंतर डेट निष्फळ ठरली आणि वेळ वाया गेला म्हणून मुलाने तिच्याकडून 2,600 रुपयांची भरपाई मागितली आहे. नेटकऱ्यांनी या मुलाच्या या स्टाईलवर केवळ आश्चर्यच व्यक्त केले नाही तर त्याच्या भन्नाट शैलीचे कौतुक देखील केले जात आहे.
वेळ वाया घालवल्याचे मागितले पैसे
दरम्यान, तरूणीच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. टिकटॉक युजर्सने म्हटले की तिला एक प्रिंटेड इनव्हॉइस मिळाले आहे, जे तिने वेळ वाया घालवला म्हणून देण्यात आले आहे. मुलीने सांगितले, "मी त्याला मेसेज करून सांगितले होते की यापुढे आपले काहीही होऊ शकत नाही." मुलीचा मेसेज पाहताच संतापलेल्या मुलाने चक्क भरपाई मागितली. यानंतर जेवणासाठी 1,500 रुपये आणि ड्रिंक्सचे 1,100 रुपये असे एकूण 2,600 रुपये बिल मुलाने पाठवले. लक्षणीय बाब म्हणजे ही गोष्ट पैशाची नाही, तर तत्त्वांची आहे, असेही मुलाने स्पष्ट केले.
मुलाच्या कृत्यावर नेटकरी फिदा
मुलाने तरूणीकडून बिलाचे पैसे वसूल केल्यामुळे नेटकरी संबंधित मुलाचे कौतुक करत आहेत. कमेंटमधून हिरोची उपमा देत खोचक टोला देखील लगावला जात आहे. एका युजरने मजेशीर टिप्पणी करत लिहले की, आता वेळ वाया घालवल्याबद्दल मी माझ्या एक्सला देखील बिल पाठवीन.