प्रगती की अधोगती? आता तुम्हीच ठरवा...एकाचवेळी चिमुकला खेळतोय गेम अन् पाहतोय रिलही!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 01:25 PM2023-11-13T13:25:04+5:302023-11-13T13:27:10+5:30

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

People Surprised by Child multitasking Amazing video goes viral | प्रगती की अधोगती? आता तुम्हीच ठरवा...एकाचवेळी चिमुकला खेळतोय गेम अन् पाहतोय रिलही!

प्रगती की अधोगती? आता तुम्हीच ठरवा...एकाचवेळी चिमुकला खेळतोय गेम अन् पाहतोय रिलही!

Viral Video: सोशल मीडियाने प्रत्येकाचे जीवन व्यापून टाकले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला सोशल मीडिया हे परिचयाचे माध्यम आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा अगदी वेगाने आपल्या हातातील फोन आणि टॅबलेट हाताळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल, एवढे मात्र नक्की.

एक काळ असा होता, जेव्हा आई-वडील, आजी-आजोबा, घरातील अन्य मंडळी यांसोबत वेळ घालवणे, खेळणे, दंगा करणे, टीव्हीवर कार्टून पाहणे असा लहान मुलांचा दिनक्रम असायचा. मात्र, आताच्या घडीला पालक मुलांना वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे मुलांच्या हातात अगदी लहान वयापासून मोबाइल, टॅबलेट अशा गोष्टी आल्या आहेत. मोबाइल किंवा टॅबलेटवर व्हिडिओ पाहणे, सोशल मीडियावरील रिल्स पाहणे, असा लहान मुलांचा दिनक्रम होऊन बसला आहे. लहान मुलांच्या हातातून मोबाइल सुटताना दिसत नाही. लहान मुलांचा स्वभाव हट्टी झाला आहे. पालकांची इच्छा असूनही आता ते मुलांना मोबाइल किंवा टॅबेलटपासून दूर करू शकत नाहीत. 

फोन आणि टॅबलेटचा एकत्र वापर

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये लहान मुलाच्या एका हातात मोबाइल आणि दुसऱ्या हातात टॅबलेट दिसत आहे. हा लहान मुलगा फोन आणि टॅबलेट वेगाने वापरताना दिसत आहे. आजकाल सर्वत्र पाहिले तर थोरा-मोठ्यांनाही लाजवेल अशा पद्धतीने लहान मुले मोबाइल वापरण्यात फास्ट आणि फॉरवर्ड झाली आहेत. कोणत्याही प्रकारचा मैदानी खेळ खेळण्याऐवजी लहान मुले तासानतास मोबाइलवर वेळ घालवताना दिसतात. आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे मुलांच्या हातात मोबाइल सोपवणाऱ्या पालकांना हा व्हिडिओ एक चपराक असल्याचे सांगितले जात आहे. बीझी लाइफस्टाइलमुळे आपल्या पाल्याला पुरेसा वेळ देणे पालकांना शक्य नसते. एकंदरीत हा व्हिडीओ त्या पालकांचे डोळे उघडणारा ठरू शकतो, अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगल्याचे दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत नेमके काय?

व्हायरल होणारा व्हिडिओ केवळ ८ सेकंदाचा आहे. या व्हिडिओत निळा टी-शर्ट घातलेला एक लहान मुलगा सोफ्यावर आरामशीर बसलेला आहे. त्याच्या उजव्या हातात स्मार्टफोन आणि डाव्या हातात टॅबलेट आहे. या लहान मुलाचा मोबाइल आणि टॅबलेट हाताळण्याचा वेग पाहून खरोखर थक्क व्हाल. क्षणार्धात हा मुलगा पटकन मोबाइलवर रिल्स पाहत असताना, तो दुसऱ्या हातातील टॅबवर गेम खेळतो. 

दरम्यान, एक्सवर एका युझरने ही पोस्ट शेअर केली आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ साधारणत ९ नोव्हेंबर रोजी पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओला आतापर्यंत ६ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या मुलाला देण्यात येत असलेली शिकवण योग्य नाही. पालकांनी चांगले संगोपन केलेले नाही, असे एका युझरने म्हटले आहे. तर ही काही थट्टा किंवा मस्करी नाही, असेही एका युझरने म्हटले आहे.


Web Title: People Surprised by Child multitasking Amazing video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.