"गाढवावरुन ऑफीसला येण्याची परवानगी द्या", कर्मचाऱ्याची बॉसकडे अजब मागणी!, कारण काय? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 04:31 PM2022-06-04T16:31:10+5:302022-06-04T16:31:46+5:30
पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य जनता वेठीस धरली गेली आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य जनता वेठीस धरली गेली आहे. अशातच शेजारील पाकिस्तानमधील एका व्यक्तीनं वाढत्या इंधनाच्या किमतीवरुन एक अशी आगळीवेगळी मागणी केली आहे की ज्यानं सर्वच हैराण झाले आहेत. कार आणि बाइक सोडून या व्यक्तीनं थेट गाढव गाडी वापरण्याची परवानगी आपल्या बॉसकडे केली आहे. सोशल मीडियावर या पाकिस्तानी व्यक्तीची पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार अशी मागणी करणारा दुसरं तिसरं कुणी नसून पाकिस्तानी नागरी उड्डाण प्राधिकरणाचा एक कर्मचारी आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीनं हाहाकार केलेला असल्यानं कर्मचाऱ्यानं गाढव गाडीतून कार्यालयात येण्याची मागणी केली आहे. यातून समजापुढे नवं उदाहरण दाखवून देण्याचंही त्यानं म्हटलं आहे.
सरकारी कर्मचाऱ्यानं नागरी उड्डाण विभागाच्या प्रमुखांना पत्र लिहून ऑफिसला येण्यासाठी खासगी वाहनापेक्षा गाढवावरुन येण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. इतर कोणत्याही प्रकारच्या वाहनाचा खर्च आता आपल्याला परवडणारा नाही असंही त्यानं म्हटलं आहे. विमानतळावरही आता गाढव गाडीचा वापर केला जावा अशीही परवानगी त्यानं मागितली आहे.
सोशल मीडियावर पत्र व्हायरल
पाकिस्तानी कर्मचाऱ्याचं हे समोर येताच काही क्षणात ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. युझर्सनं त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केली. काहींनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे खासगी वाहनांचा वापर करणं आता अशक्य असल्याचं म्हणत आपलं मन मोकळं केलं आहे. तर काहींनी या कर्मचाऱ्याच्या कल्पनेचं कौतुक केलं आहे तर काहींनी हा फक्त एक स्टंट असल्याचं म्हटलं आहे.
पाकिस्तानी माध्यमांमधील माहितीनुसार, संबंधित कर्मचाऱ्याचं नाव राजा आसिफ इकबाल असं आहे आणि तो इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करतो. त्यानं लिहिलेल्या पत्रात महागाईनं केवळ गरीबांचं नव्हे तर मध्यम वर्गीयांचंही कंबरडं मोडलं असल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे आपलं खासगी वाहन आता वापरणं कठीण होऊन बसलं असल्याचं त्यानं म्हटलं आहे. त्यानं विमानतळावर गाढव गाडी वापरण्यात यावी अशी परवानगी मागितली आहे.
पाकिस्तानात पेट्रोलच्या किमती २०० रुपये प्रतिलीटर इतकी झाली आहे. तर डिझेल देखील २०० रुपयांचा आकडा गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे.