VIDEO: माणुसकीला सलाम! पाण्याच्या थेंबासाठी माकडाची वणवण, मग पोलिसानं केलं मन जिंकणारं काम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 12:44 PM2022-04-04T12:44:25+5:302022-04-04T12:45:28+5:30
उन्हाळा सुरू झाल्यानं तापमानाचा पाराही झपाट्यानं वाढत आहे. अशा परिस्थितीत माणसांचीही अवस्था बिकट होत चालली आहे. उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याचं अनेकदा दिसून येतं
उन्हाळा सुरू झाल्यानं तापमानाचा पाराही झपाट्यानं वाढत आहे. अशा परिस्थितीत माणसांचीही अवस्था बिकट होत चालली आहे. उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याचं अनेकदा दिसून येतं, त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मुख्य रस्त्यांवर येऊन पोहोचतात. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. अशा व्हिडिओंनी मन हेलावतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पोलीस हवालदार तहानलेल्या माकडाला पाणी देताना दिसत आहे.
सध्या एका पोलीस हवालदाराचा तहानलेल्या माकडाला पाणी देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे बघून सगळ्यांच्याच हृदयाला पाझर फुटला. हा व्हिडिओ मुंबई-अहमदाबाद मार्गावरील माळशेज घाटातील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओमध्ये पोलीस हवालदार उष्णतेनं त्रासलेल्या माकडाचा जीव वाचवण्यासाठी त्याला पाणी पाजत असल्याचं दिसून येतं. माकडही बाटली धरून तहान भागवताना दिसत आहे. माकड ज्यापद्धतीनं आणि वेगानं पाणी पिताना दिसतंय त्यावरुन त्याला ते किती तहानलेलं होतं हे लक्षात येतं. माकडाची तहान भागवून त्याचा जीव वाचवल्याबद्दल वाहतूक पोलीसाचंही कौतुक केलं जात आहे.
Be kind wherever possible 💕💕
— Susanta Nanda IFS (@susantananda3) April 3, 2022
This video of constable Sanjay Ghude is circulating in SM for all the good reasons 🙏🙏 pic.twitter.com/oEWFC2c5Kx
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी, 'जेथे शक्य असेल तेथे दयाळू व्हा. कॉन्स्टेबल संजय घुडे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे', असं कॅप्शन दिलं आहे.
आतापर्यंत या व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकली आहेत. व्हिडिओवर व्ह्यूज आणि लाईक्सचा पाऊस सुरू आहे. माकडाला पाणी देणाऱ्या पोलीस हवालदाराचं यूजर्स कौतुक करताना दिसत आहेत.