Video - हृदयद्रावक! घर सोडू नये म्हणून आई-वडिलांची धडपड; लेकासमोर हात जोडले, पाया पडले पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 12:16 PM2023-06-19T12:16:30+5:302023-06-19T12:26:33+5:30
काही मुलं त्यांच्या पालकांना घरातून हाकलून देतात, तर काही लोक त्यांच्या वृद्ध आईवडिलांना सोडून इतरत्र राहतात.
रविवारी फादर्स डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर ह्रदयस्पर्शी मेसेज आणि फोटो पाहायला मिळाले. फादर्स डे साजरा करण्यासाठी जगभरातील लोकांनी त्यांच्या वडिलांसोबतचे फोटो आणि त्यांच्या सन्मानार्थ मेसेज शेअर केला. अर्थात मदर्स डेच्या दिवशीही असंच दृश्य पाहायला मिळतं. मात्र, भारतात वृद्धाश्रमांची वाढती संख्या वेगळंच चित्र सांगत आहे. अनेक वयोवृद्ध पालकांनाही त्यांच्या भविष्याची भीती वाटते.
काही पालकांना त्यांच्या मुलांकडून आशा आहेत, त्यांच्यासोबत राहण्याचे स्वप्न आहे पण शेवटी त्यांच्या पदरी निराशाच येते. असाच एक हृदयद्रावक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडिओने लोकांचा विचार करायला भाग पाडले आहे. काही मुलं त्यांच्या पालकांना घरातून हाकलून देतात, तर काही लोक त्यांच्या वृद्ध आईवडिलांना सोडून इतरत्र राहतात. या व्हिडीओमध्ये वृद्ध आई-वडील आपल्या मुलाच्या पाया पडताना दिसत आहेत. तसेच सुनेला घराबाहेर न पडण्याची विनंती करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती तरुणाच्या पाया पडत आहे तर एक वृद्ध महिला हात जोडून उभी आहे. हात जोडून उभी राहणारी व्यक्ती ही मुलाची आई आहे. वडील तरुणाचे पाय धरतात पण मुलगा ऐकत नाही. आई-वडील मुलाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. त्याचा पाठलाग करतात. आई देखील असहायपणे आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांना मुलाला थांबवण्यासाठी मदतीची याचना करत असते.
वृद्ध आई-वडील आपल्या मुलाला आणि सुनेला घरातून बाहेर पडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. ही संपूर्ण घटना एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केली. व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही. व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. yashofficialy20 ने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओने अनेक युजर्सला भावूक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.