Video: 'डान्सिंग अंकल'नंतर 'डान्सिंग सर' आले; नाचत-गात शिकवतात विद्यार्थ्यांना धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 03:14 PM2019-08-27T15:14:09+5:302019-08-27T15:17:47+5:30
एखाद्या सामान्य व्यक्तीला रातोरात ‘इंटरनेट स्टार’ बनविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. सोशल मीडियावर कधी काय होईल सांगता येत नाही. याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात.
एखाद्या सामान्य व्यक्तीला रातोरात ‘इंटरनेट स्टार’ बनविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. सोशल मीडियावर कधी काय होईल सांगता येत नाही. याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. सोशल मीडियावर डान्सिंग अंकल व्हायरल झाले होते. तर काही दिवसांपूर्वी राणू मंडल यांचं तर सोशल मीडियामुळे संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. यांच्याप्रमामेच आणखी एक व्यक्ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या एक व्हायरल होणारा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ ओदिशामधील एका शाळेच्या मुख्याध्यापकांचा असून त्यांचं नाव प्रफुल्ल कुमार पाथी असं आहे. ते ओदिशातील एका सरकारी शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करतात. आता तुम्ही म्हणाल यात व्हायरल होण्यासारखं आहे तरी काय? खरं तर प्रफ्फुल कुमार आपल्या शिकवण्याच्या हटके स्टाइलमुळे व्हायरल होत आहेत.
प्रफुल्ल कुमार नेहमीच्या शिकवण्याच्या पद्धतीऐवजी हटके पद्धतीने मुलांना शिकवतात. त्यांच्या याच शैलीमुळे ते 25 ऑगस्टपासून इंटरनेट स्टार बनले आहेत. त्यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की, ते शाळेतील मुलांना गाण्यांमधून तसेच डान्स करत शिकवत आहेत. प्रफुल्ल कुमार शाळेत जो विषय शिकवायचा आहे, त्याची घरातूनच तयारी करून येतात.
सोशल मीडियावर शेअर करण्यात येणाऱ्या या व्हिडीओमध्ये प्रफुल्ल कुमार क्लासरूममध्ये गाणं म्हणत शिकवताना दिसत आहेत. तसेच त्याच उत्साहात विद्यार्थीही त्यांच्यासोबत ठेका धरताना दिसत आहेत.
#WATCH: Prafulla Kumar Pathi, the in-charge headmaster of Lamtaput upper primary school of Odisha’s Koraput district, teaches kids through songs, dance; says, "we've seen that the numbers of students attending schools have increased due to this method". pic.twitter.com/VnvN0jyLha
— ANI (@ANI) August 26, 2019
56 वर्षांचे प्रफुल्ल कुमार कोरापुट जिल्ह्यातीव लमतापुट अपर प्रायमरी शाळेमध्ये शिकवत आहेत. आपल्या याच वेगळ्या अंदाजामुळे त्यांना सर्वजण 'डान्सिंग सर' म्हणून ओळखतात. डान्सिंग सर यांनी ANI शी बोलताना सांगितलं की, 'मला हे जाणवलं आहे की, जर मुलांना वेगळ्या पद्धतीने शिकवलं तर मुलं आवडीने शिकतात. त्यांना कंटाळा येत नाही. त्यामुळेच मी शिकवण्याची वेगळी पद्धत आत्मसात केली. जेव्हा मी गाणं आणि डान्स करत शिकवण्यास सुरुवात केली तेव्हापासून मुलं आणखी उत्साहात आणि मनापासून अभ्यास करू लागली.'
प्रफुल्ल कुमार म्हणजेच डान्सिग सर शाळेत येण्याआधी सर्व विषय गाण्यामध्ये बसवतात आणि त्याचा सरावही करतात. मीडिया रिपोर्टनुसार, असं दिसून आलं आहे की, शाळेतील अनेक मुलं प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याआधीच शाळा सोडतात. पण त्याच्या या आगळ्या-वेगळ्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे शाळेत येणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे.'