...अन् २ वर्षापूर्वी दुरावलेल्या बाप-लेकाची भेट घडली; एका टिकटॉक व्हिडीओनं कशी केली कमाल?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 08:17 AM2020-05-29T08:17:41+5:302020-05-29T08:21:05+5:30
पंजाबच्या लुधियाना शहरातील एका फ्लायओव्हरखाली अनेक बेघर लोक राहतात. २ वर्षापूर्वी एक ५५ वर्षीय व्यक्ती या पुलाखाली राहायला आला.
भद्रादी – तेलंगणाच्या कोठागुडममधील एका कुटुंबासाठी टिकटॉक देवदूत म्हणून आल्याचं दिसून आलं. टिकटॉक व्हिडीओच्या माध्यमातून २ वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या वडिलांची आणि मुलाची भेट घडून आली आहे. रोद्दम पेद्दीराजू या मुलाला आयुष्यात पुन्हा कधीच आपल्या वडिलांची भेट होणार नाही असचं वाटत होतं. मात्र एका व्हिडीओमुळे त्याचे वडील पुन्हा घरी परतले आहेत.
पंजाबच्या लुधियाना शहरातील एका फ्लायओव्हरखाली अनेक बेघर लोक राहतात. २ वर्षापूर्वी एक ५५ वर्षीय व्यक्ती या पुलाखाली राहायला आला. जेव्हा स्थानिक लोकांनी त्याच्याबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांना काही सांगता आले नाही. त्यानंतर या व्यक्तीला स्थानिक भाषा येत नसल्याचं माहिती पडलं. त्यासोबत या व्यक्तीला ऐकायला आणि बोलायलाही त्रास होत असल्याचं दिसून आलं.
या व्यक्तीबाबत स्थानिक लोकांनाही काहीच माहिती नव्हती. शिवाय ही व्यक्ती अशिक्षित असल्याने त्यांना वाचायला-लिहायलाही येत नव्हतं. त्यामुळे गेल्या २ वर्षापासून तो फ्लायओव्हरखालीच राहू लागला. भिक मागून, लोकांनी दिलेलं अन्न यावर निर्भर झाला. सध्या कोरोना व्हायरसमुळे अशा बेघर लोकांची मोठी अडचण झाल्याचं दिसून येत आहे. अशातच एकेदिवशी पंजाब पोलीसमधील कॉन्स्टेबल अजैब सिंग या बेघरांसाठी जेवण देत होता. तेव्हा गुरुप्रीत नावाच्या एका मुलाने याचा व्हिडीओ बनवून टिकटॉकवर अपलॉड केला. ही घटना मार्चमधील आहे.
कॉन्स्टेबल अजैय सिंह सांगतात की, अशाप्रकारे व्हिडीओच्या माध्यमातून ते लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात. पण हा व्हिडीओ पंजाबपासून २ हजार किमी दूर तेलंगणामध्ये पोहचेल असं वाटलं नाही, या व्हिडीओच्या माध्यमातून एक बेघरला पुन्हा आपलं कुटुंब मिळालं. भद्रादीच्या पिनापाका गावातील नागेंद्रबाबू यांनी हा व्हिडीओ पाहिला. त्यांनी अनेकदा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यातील बेघर व्यक्ती आपला मित्र रोद्दमचे वडील असल्याचं त्यांनी ओळखलं.
२७ एप्रिल २०१८ रोजी रोद्दमचे वडील नजीकच्या गावात काम करण्यासाठी गेले होते. ते हायवेला एका ट्रकमध्ये बसले, पण गाडीत त्यांना झोप लागली. ट्रक ड्रायव्हरलाही याचा अंदाज आला नाही, काही किमी अंतरावर गेल्यावर ड्रायव्हरने वडिलांना गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर दुसऱ्या ट्रकला हात दाखवून त्यांनी मदत मागितली. वडिलांना वाटलं की ते पुन्हा त्यांच्या जिल्ह्यात जातील पण या ट्रकने त्यांना लुधियाना येथे सोडून दिलं. त्यानंतर गेल्या २ वर्षापासून ते तेथील फ्लायओव्हरखाली राहत होते.