रायगडावर पावसाचं रौद्ररूप! महादरवाज्यातून पाण्याचा मोठा प्रवाह, VIDEO पाहून काळजाचा थरकाप उडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 02:05 PM2024-07-08T14:05:21+5:302024-07-08T14:08:51+5:30
गेले २४ तास सुरु असलेल्या मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलं आहे.
Raigad Monsoon Update : गेले २४ तास सुरु असलेल्या मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलं आहे. पावसामुळे रायगडातदेखील ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली असून किल्ले रायगडाच्या पायऱ्यांवरून धबाधब्यासारखं पाणी वाहतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, कालपासून रायगडमध्ये पावसाने धुवाँधार बॅटिंग केली असून, या पावसाचा जोर उत्तरोत्तर वाढत असल्याने सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत सिंधुदुर्गला रेड तर रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, ११ जुलैपर्यंत कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच सोशल मीडियावर रायगडावरील पुर सदृश परिस्थिती दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पावसाळ्यात पर्यटनासाठी गेलेले काही पर्यटक सुद्धा दिसून येत आहेत. दरम्यान, पोलीस प्रशासनाने या पर्यटकांची वाहत्या पाण्यातून सुखरुप सुटका केली आहे.
एकंदरीत धो-धो कोसळणारा पाऊस आणि किल्ल्याच्या पायऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा लोट पाहून कोणालाही धडकी भरेल. या पार्श्वभूमीवर आजपासून रायगड किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. काल दिवसभरात रायगड जिल्ह्यत पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यातच दिवसभर पावसाची रिपरिप चालू असल्याने नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलं आहे. आपात्कालीन परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता किल्ल्यावर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.