रतन टाटांची 'नॅनो' मधुन ताज हॉटेलमध्ये एन्ट्री, साधेपणाने नेटीझन्सची मने पुन्हा जिंकली...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 07:59 PM2022-05-18T19:59:48+5:302022-05-19T10:47:14+5:30
नॅनो गाडीतुन ताज हॉटेलमध्ये एन्ट्री घेत रतन टाटा यांनी लोकांची पुन्हा एकदा मने जिंकली. त्यांची ही एन्ट्री viralbhayani या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आली अन् काही क्षणांतच नेटकऱ्यांनी त्यावर आपल्या पसंतीची मोहोर उठवत त्याला व्हायरल केले.
माणसानं किर्तीनं मोठं अन् राहणी किती साधी असावी याचं आत्ताच्या काळातलं उत्तम उदाहरण म्हणजे रतन टाटा. याआधीही जागतिक किर्तीच्या या व्यवसायिकाने त्यांच्या साध्या राहणीतुन लोकांची मनं जिंकलीयत. काहीच दिवसांपुर्वी त्यांनी एका इमोशनल इन्स्टाग्राम पोस्टद्वारे टाटा नॅनो या मध्यमवर्गींयांच्या अवाक्यातल्या गाडीची गोष्ट सांगितली. आता त्याच नॅनो गाडीतुन ताज हॉटेलमध्ये एन्ट्री घेत रतन टाटा यांनी लोकांची पुन्हा एकदा मने जिंकली. त्यांची ही एन्ट्री viralbhayani या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आली अन् काही क्षणांतच नेटकऱ्यांनी त्यावर आपल्या पसंतीची मोहोर उठवत त्याला व्हायरल केले.
पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये रतन टाटा नॅनोमधुन ताज हॉटेलच्या प्रवेशद्वारातून नॅनोने आत येत आहेत. कोणताही झगमगाट नाही की गाजावाजा नाही. साध्या पेहरावत, ड्रायव्हरसोबत पांढऱ्या रंगाच्या नॅनो गाडीमध्ये टाटांनी ही एन्ट्री घेतली. मुख्य म्हणजे इतका मोठा माणूस असून बॉडीगार्डचा गराडा नाही. हॉटेलच्या स्टाफनेच त्यांचे स्वागत केले व आत नेले. त्यांच्या या साधेपणावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
नॅनो गाडीबाबत काही दिवसांपूर्वी नॉस्टॅलजिक पोस्ट लिहिणाऱ्या रतन टाटा यांनी लिहिले, मी अनेकदा माझ्या कुटुंबासह स्कूटरवार लोकांना पाहतो. पाहण्यासाठी, जिथे मुले कशीतरी त्यांच्या वडिलांच्या आणि आईच्या मध्ये बसलेली दिसली. ते सँडविचसारखे होते. या लोकांसाठी कार बनवण्याची मला प्रेरणा मिळाली. आर्किटेक्चर स्कूलमधून असण्याचा फायदा असा झाला की मी माझ्या फावल्या वेळेत डूडल करायचो. डूडल बनवताना नॅनोचा विचार मनात आला. रतन टाटा पुढे लिहितात, माझ्या फावल्या वेळेत डूडल बनवताना मला वाटायचे की जर मोटारसायकलच अधिक सुरक्षित झाली तर कशी होईल. हे लक्षात घेऊन, मी बग्गीसारखी दिसणारी आणि दार नसलेली कार डूडल केली. त्यानंतर मी विचार केला की सामान्य लोकांसाठी कार बनवावी आणि मग टाटा नॅनो अस्तित्वात आली, जी आपल्या सामान्य लोकांसाठी होती.
प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी झगमगाटात राहणाऱ्या आणि बडेजाव मिरवणाऱ्या सेलिब्रिंटीनी रतन टाटा यांच्याकडुन सामान्य माणसांचा आदर्श बनून राहण्याचा 'नॅनो' प्रयत्न जरी केला तरी पुरेसा आहे, असंच म्हणावं लागेल.