रतन टाटांना वाढदिवसाचा केक भरवणारा, खांद्यावर हात ठेवणारा तरुण आहे तरी कोण? व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 11:23 AM2021-12-30T11:23:29+5:302021-12-30T11:24:25+5:30
रतन टाटांना वाढदिवसाचा केक भरवणारा, खांद्यावर हात ठेवणारा तरुण आहे तरी कोण? जाणून घ्या...
नवी दिल्ली: TATA समूहाचे सर्वेसर्वा आणि दिग्गज उद्योगपती म्हणून जगात नाव असलेल्या रतन टाटा (Ratan Tata) यांनी अत्यंत साधेपणाने २८ डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा केला. यावेळी एक कप केक कापतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रतन टाटा यांच्या बर्थ डे सेलिब्रेशनसह त्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणाची चर्चाही मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर होताना पाहायला मिळाली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रतन टाटा एका खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. त्यांच्यासमोरील टेबलावर एक कप केक ठेवला आहे. छोट्या केकवर लावलेल्या मेणबत्तीला फुंकर मारत रतन टाटा हा केक कापतात. त्यानंतर समोरच्या टेबलजवळ बसलेला तरुण रतन टाटांच्या बाजूला येऊन उभा रातो आणि त्यांच्या खांद्यावरुन मायेने हात ठेवतो. नंतर तो खाली बसतो आणि कापलेल्या कप केकचा एक तुकडा रतन टाटांना भरवतो.
रतन टाटांना प्रेमाने केक भरवणारा हा तरुण आहे तरी कोण?
सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. पण या व्हिडीओत अगदी प्रेमाने रतन टाटांना केक भरवणारा हा तरुण आहे तरी कोण, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर हा तरुण ३० वर्षांचा आहे. या तरुणाचे रतन टाटांसोबत खास कनेक्शन आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये रतन टाटांच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या, त्यांना केक भरवणाऱ्या तरुणाचे नाव शंतनू नायडू आहे. शंतनू हा रतन टाटांचा पर्सनल सेक्रेट्ररी म्हणजेच स्वीय सहाय्यक आहे. रतन टाटा तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. मात्र खूपच कमी लोकांना माहिती असेल की, ८५व्या वर्षात पदार्पण रतन टाटांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करणारा मुलगा केवळ ३० वर्षांचा आहे.
खुद्द रतन टाटांनी फोन करून दिली ऑफर
खुद्द रतन टाटा यांनी फोन करुन, तू माझ्याबरोबर काम करणार का? अशी विचारणा केली होती. यावर विश्वास बसणे फारच अवघड आहे. मात्र, खरोखरच रतन टाटांनी शंतनू नायडू या तरुणाला फोन करुन स्वत: कामाची ऑफर दिली. यासंदर्भातील शंतनूचा प्रवास सांगणारी एक पोस्ट व्हायरलही झाली होती. एका वृत्तानुसार, शंतनू हा रतन टाटांबरोबर अनेक ठिकाणी फिरतो. अनेकदा नवीन स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात सल्ले रतन टाटा शंतनूकडून घेतात, असेही सांगितले जाते.
दरम्यान, मागील अनेक महिन्यांपासून रतन टाटांसोबत काम करत आहे. मात्र, आजही अनेकदा स्वत:ला चिमटा काढून हे स्वप्न तर नाही ना, याची खात्री करून घेतो. चांगला मित्र, चांगला मार्गदर्शक आणि चांगला बॉस मिळावा म्हणून माझ्या वयाचे तरुण झगताना दिसतात. अशावेळी माझा माझ्या नशिबावर विश्वास बसत नाही, हे मला रतन टाटा नावाच्या एका सुपर ह्युमनमध्ये मिळाले आहे, असे शंतनूने एका मुलाखतीत म्हटले होते.