‘घरभाडे द्यायचेय... कुणी किडनी विकत घेता का?’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2023 09:23 AM2023-02-27T09:23:31+5:302023-02-27T09:23:44+5:30
ही जाहिरात सोशल मीडियावर अनेक लोकांनी शेअर केली. मात्र या जाहिरातीत राख्यमने एक गंमत केली आहे.
घरभाडे देण्यासाठी ‘माझी डावी किडनी विकणे आहे‘ अशी जाहिरात बंगळुरूमधील एका व्यक्तीने झाडावर चिकवटल्याने खळबळ उडाली आहे. राख्यम या नावाने यूजरने ट्विटरवर शेअर केलेल्या जाहिरातीत म्हटले आहे की, घरमालकाला डिपॉझिटची रक्कम देण्यासाठी खूप पैशांची आवश्यकता आहे. त्यामुळे मी किडनी विकायला काढली आहे.
ही जाहिरात सोशल मीडियावर अनेक लोकांनी शेअर केली. मात्र या जाहिरातीत राख्यमने एक गंमत केली आहे. माझी डावी किडनी विकायला काढली आहे असे लिहिल्यानंतर त्या मजकुराखाली थोडी जागा सोडून त्याने लिहिले की, मी थट्टा करत होतो. पण मला बंगळुरूमधील इंदिरानगरमध्ये एक घर घ्यायचे आहे. प्रोफाइलसाठी कोड स्कॅन करण्याचे आवाहनही त्याने केले. ही जाहिरात देणाऱ्या व्यक्तीने त्यासोबत क्यूआर कोडही दिला आहे. या आगळ्या जाहिरातीवर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. बंगळुरूमध्ये घरांचे भाडे व डिपॉझिटची वाढती रक्कम याबद्दल नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली.
या व्हायरल पोस्टरनंतर घराचे भाडे आणि डिपॉझिट रकमेच्या चर्चेला उधाण आले. बंगळुरूमध्ये जगभरातील अनेक लोक राहतात. अशी जाहिरात सोशल मीडियावर टाकण्याच्या निर्णयाचे एका नेटकऱ्याने कौतुक करत म्हटले की, मीही वाढत्या घरभाड्यासंदर्भात १०० टक्के अशीच कृती केली असती.