माऊली, तुला सलाम! एका वर्षाचं बाळ कडेवर सांभाळत दिल्ली स्टेशनवर RPF महिला 'ऑन ड्युटी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:38 IST2025-02-17T16:35:02+5:302025-02-17T16:38:38+5:30
RPF Police Mother carrying child on Duty, New Delhi Railway Station Stampede News: रेल्वे पोलिस असलेल्या या महिलेचे 'दुहेरी कर्तव्य' पार पाडतानाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

माऊली, तुला सलाम! एका वर्षाचं बाळ कडेवर सांभाळत दिल्ली स्टेशनवर RPF महिला 'ऑन ड्युटी'
RPF Police Mother carrying child on Duty, New Delhi Railway Station Stampede News: दिल्लीत १५ फेब्रुवारीला एक विचित्र प्रकार घडला. महाकुंभमेळ्यात जाऊन स्नान करण्याच्या दृष्टीने अनेकांनी रेल्वेस्टेशन गाठले. अचानक अपेक्षित ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलला आणि एकच गोंधळ उडाला. या धावपळीत चेंगराचेंगरी झाली आणि सुमारे १८ लोकांना आपला जीव गमवावा लागला. घडलेल्या दुर्दैवी प्रसंगानंतर आता नवी दिल्लीरेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रेल्वे प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. याचदरम्यान, एका महिला पोलिसाचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आपल्या चिमुकल्या बाळाला कडेवर घेऊन ती महिला आपले कर्तव्य बजावताना दिसतेय. तिच्या या समर्पणाला सारेच सलाम करत आहेत.
व्हायरल फोटो, व्हिडीओंमध्ये काय?
चेंगराचेंगरीचा प्रसंग घडून गेल्यानंतर पोलिस यंत्रणा अधिक सतर्क आहे. पुन्हा असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून आरपीएफ आणि दिल्ली पोलिसांनी सज्जता दाखवली आहे. रविवारी १६ फेब्रुवारी रोजी आरपीएफ आणि दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांना विशेष सतर्क करण्यात आले होते. सर्वांनीच आपली जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न केला. रविवारी जेव्हा प्रवासी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर होते, तेव्हा त्यांना एका महिला आरपीएफ जवान 'दुहेरी कर्तव्य' बजावताना दिसली. एक म्हणजे पोलिसांचे कर्तव्य आणि दुसरे म्हणजे आईपणाचे कर्तव्य.
कोण आहे ही आरपीएफ महिला जवान?
या महिलेचे नाव रीना आहे. ती आरपीएफमध्ये काम करते. ड्युटी दरम्यान रेल्वे प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून कॉन्स्टेबल रीना प्रवाशांना सतर्क करत आहे. तसेच ती तिच्या नवजात बाळाला कडेवर घेऊन आहे. आपले दुहेरी कर्तव्य बजावताना दिसते आहे. आरपीएफ कॉन्स्टेबल रीनाचे कर्तव्य बजावतानाचे फोटो आणि व्हिडीओ अनेकांनी टिपले असून सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.
सारेच या माऊलीला करताहेत सलाम!
या महिला आरपीएफ जवानाला पाहून लोक तिला सलाम करत आहेत. ही महिला जवान कडेवर छोटं बाळ असूनही अतिशय संयमाने प्रवाशांची मदत करताना दिसत आहे. त्यामुळे लोक तिच्या संयमी आणि शांत स्वभावाचीही स्तुती करत आहेत.