"गुवाहाटीची ऑफर होती मग हॉटेलचं बूकिंग मिळत नाही कशाला ओरडत होतात?"; नेटकऱ्यांनी घेतली संजय राऊतांची शाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 02:20 PM2022-07-02T14:20:29+5:302022-07-02T14:21:13+5:30
मलाही बंडखोरांसोबत गुवाहाटीची ऑफर होती, असं संजय राऊत म्हणाले होते.
Sanjay Raut Trolled: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाचा वेग अखेर मंदावला. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आणि शिंदे उपमुख्यमंत्री होणार हे त्यांच्या शपथविधीच्या काही तास आधीपर्यंत लोकांना समजत होते. मात्र शपथविधीच्या काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांनाच चकित केले. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याच दरम्यान १ जुलैला शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी गुवाहाटीला जाण्याची ऑफरही आल्याचे मोठं वक्तव्य केलं. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं.
एकनाथ शिंदे गटाचे सर्व बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. तेथील संपूर्ण हॉटेल हे त्या आमदारांसाठी राखीव असल्याचे सांगण्यात येत होते. संजय राऊतांनी सांगितले की त्या हॉटेलमध्ये बुकिंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरीही त्यांना बुकिंग मिळू शकलं नाही. याच दरम्यान ईडीच्या चौकशीनंतर संजय राऊत म्हणाले की, मला गुवाहाटीला जाण्याची ऑफर आली होती, मात्र मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. म्हणूनच मी तिकडे गेलो नाही. मी सत्यासोबत असताना मला कसलीही भीती नाही. काय होईल ते बघून घेऊ. पण त्यांच्या या विधानानंतर त्यांना ट्रोल करण्यात आले.
संजय राऊतांच्या वक्तव्यावर अमित पांडे नावाच्या युजरने लिहिले की, “मग राऊत इतके दिवस बातम्यांमध्ये का म्हणत होते की मी तिथे बुकिंग करत आहे पण माझ्यासाठी हॉटेल उपलब्ध नाही? हे निव्वळ राजकारण आहे का?" देवेंद्र शर्मा या युजरने लिहिले की, "कदाचित त्यांची गरज जास्त नसेल." रोहित (@Rohitdeo13) ने लिहिले की, मला पण ऑफर मिळाली होती पण नंतर मी नकार देऊन टाकला." तर आणखी एका युजरने (@RamaTiwari001) लिहिले की, 'मग तुम्ही आमच्या लोकांचे भाजपच्या लोकांनी अपहरण केले असा आक्रोश कसे काय करत होतात." असे विविध सवाल करत त्यांनी युजर्सनी त्यांची खिल्ली उडवली.