"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 01:18 PM2024-05-22T13:18:18+5:302024-05-22T14:02:46+5:30
विश्वास नांगरे-पाटील यांची यशोगाथा म्हणजे अनेकांसाठी प्रेरणा.
Vishwas Nangre Patil News : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांची यशोगाथा म्हणजे अनेकांसाठी प्रेरणा. अनेक तरूण-तरूणी विश्वास नागरे पाटील यांचे विचार ऐकून स्पर्धा परिक्षांकडे वळत असतात. त्यांचा प्रवास प्रेरणादायी असून, अनेकांना यामुळे त्यांच्या यशाच्या वाटा शोधण्यात मदत झाली आहे. बड्या पदांवर काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ते सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. वैयक्तिक जीवनात घडत असलेल्या बाबी ते शेअर करत असतात. आज त्यांची मुलगी जान्हवीचा वाढदिवस असून, या पार्श्वभूमीवर त्यांनी 'लेकी'साठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
ते म्हणाले की, जान्हवी हे नाव शुद्ध, निर्मळ आणि सुंदर असून, गंगा नदीशी मिळतेजुळते आहे. माझ्या राजकुमारीला २२ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... मुलगी ही वडिलांच्या हृदयात स्थान निर्माण करत असते. वडील आपले प्रेम जाहीरपणे व्यक्त करू शकत नसले तरी, ते नेहमी त्यांच्या मनाने, आत्म्याने आपल्या परीची काळजी घेत असतात. ते तिच्या चुकांना पाठीशी घालत असतात. मला तुझा खूप अभिमान आहे जान्हवी. तू विविधतेने नटलेल्या, संघर्ष आणि आव्हानांनी भरलेल्या जगात प्रवेश करत आहेस. तू एक जबाबदार, कणखर आणि समजूतदार 'दिवा' आहेस. मला खात्री आहे की, तू आवड म्हणून वकील पेशा निवडल्याने तू आनंदात आणि उत्साहाने पुढील प्रवास करशील. माझ्या 'लेकी'ला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
दरम्यान, विश्वास नांगरे-पाटील यांची एक हुशार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यांनी पोलीस सेवेत बजाविलेल्या कामगिरीबद्दल त्यांना सन २०१३ मध्ये राष्ट्रपती शौर्यपदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यावेळी ताज हॉटेलात शिरणारे ते पहिले पोलीस अधिकारी होते. विश्वास नांगरे-पाटील यांचा जन्म बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड गावी झाला. त्यांचे वडील गावचे सरपंच होते. त्यांनी आपले शालेय शिक्षण तालुक्यातील विद्यालयात पूर्ण केले आणि ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयात बी. ए. मधील सुवर्ण पदक पटकावून उत्तीर्ण झाले. उस्मानिया विद्यापीठातून एमबीएची पदवी घेऊन त्यांनी पुढे प्रशासकीय अभ्यासक्रमाला सुरुवात केली.