हृदयस्पर्शी! आईस्क्रीम खायचं वय पण आली 'ही' वेळ; आई रुग्णालयात, पैशांसाठी मुलांची धडपड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 02:53 PM2023-05-07T14:53:48+5:302023-05-07T14:59:23+5:30
मुलांची आई आजारी असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावरील उपचारासाठी पैसे जमा करावेत म्हणून मुलांवर ही वेळ आली आहे.
सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी घटना व्हायरल होत आहे. एक लहान मुलगी आणि तिचा लहान भाऊ चीनच्या हेनान प्रांतातील त्यांच्या घरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्यटनस्थळी सायकल चालवत गेले. येथे त्यांनी तीन दिवसांत एक हजारहून अधिक आईस्क्रीम विकले. मुलांची आई आजारी असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावरील उपचारासाठी पैसे जमा करावेत म्हणून मुलांवर ही वेळ आली आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, ऑनलाईन पोस्ट केलेल्या या भावंडांच्या व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, त्यांनी विकलेलं आईस्क्रीम खूपच स्वस्त होतं, तरीही त्यांनी आपल्या आईला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मुलांच्या आईला पोलिओ झाला आहे आणि ती आईस्क्रीमसह रस्त्यावर स्नॅक्स विकते. गेल्या काही दिवसांत मुलांच्या आईची तब्येत आणखी बिघडली.
पाय कमकुवत असल्याने चिमुकल्यांच्या आईला इतर कामे करता येत नव्हती. यानंतर मुलांनी जबाबदारी घेतली. रिपोर्टनुसार, सुट्टीच्या दिवशी त्यांनी 300 पेक्षा जास्त आईस्क्रिम विकल्या, दुसऱ्या दिवशी 200 आणि तिसर्या दिवशी 400 पेक्षा जास्त विकल्या गेल्या. या वर्षी त्यांनी आपल्या अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे पैसे कमावले आहेत.
आईसाठी मुलांचे हे काम पाहून चिनी सोशल मीडियावर लोक भावूक झाले. एका युजरने लिहिले की, गरीब कुटुंबातील मुले पटकन जबाबदारी घेतात. या दोन मेहनती आणि हुशार मुलांना माझा सलाम. आणखी एका युजरने लिहिले की, जे लोक तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात, त्यांचा मला हेवा वाटत नाही. पण मी अशा लोकांचे कौतुक करतो जे लहानपणापासूनच स्वतःच्या प्रयत्नातून स्वतःला आधार देतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.